आताच शेअर करा

दिनांक: १६/०३/२०२६

बांदा:पाडलोस, मडुरा, रोणापाल, निगुडे व न्हावेली परिसरात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या नाचणी पिकावर अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. रविवारी वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ व पावसाळी परिस्थिती निर्माण झाल्याने काढणीसाठी तयार झालेली नाचणी धोक्यात आली आहे. अवकाळी पाऊस पडल्यास नाचणी गळून मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस, मडुरा, रोणापाल, निगुडे व न्हावेली परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नाचणीचे पीक घेतले जाते. येथील शेतकरी पारंपरिक पद्धतीने मेहनत करून नाचणीचे उत्पादन घेतात. यंदाही चांगल्या हवामानामुळे नाचणीचे पीक समाधानकारक आले असून अनेक ठिकाणी पीक काढणीसाठी तयार झाले आहे.
मात्र शनिवार व रविवारी वातावरणात अचानक बदल झाला. आकाश ढगाळ झाले असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या अनेक शेतांमध्ये नाचणी काढणीयोग्य तयार असून काही ठिकाणी कापणीही सुरू झाली आहे.
अशा स्थितीत अवकाळी पाऊस पडल्यास काढणीसाठी तयार असलेली नाचणी गळून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादनात घट होऊन आमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
पीक वाया जाण्याची भीती
वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक हातातोंडाशी आले असताना अवकाळी पावसामुळे ते हिरावले जाऊ नये, अशी प्रार्थना शेतकरी व्यक्त करत आहेत. हवामान लवकरच स्थिर व्हावे, अशी अपेक्षा या भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed