
दिनांक: ०१/०३/२०२६
बांदा: सिंधुदुर्ग फळबागायतदार -शेतकरी संघाने पुढाकार घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांबाबत संघर्षाची भूमिका घेतली आणि त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये एक वेगळी विचारधारा निर्माण झाली आणि त्याचं फलित आपण सर्वजण आज बघत आहोत .निवेदने – धरणे आंदोलने -ठिय्या आंदोलने -रास्ता रोको -जिल्हाधिकारी प्रांताधिकारी – तहसिलदार कार्यालयावर मोर्चा इत्यादी लोकशाहीची आयुधे वापरून शासनाला नमविण्यात यशस्वी झाले . हल्लीच फळपीक पंचनाम्याबद्दल जो उठाव केला तो प्रश्न पार विधानसभेत गेल्यामुळे ताबडतोब आपल्या काजू व आंबा फळ पिकांचे पंचनामे शास्त्रज्ञांच्या समितीमार्फत व कृषी खात्याच्या सहयोगाने सुरू झाले .आणि आज हे पथक सावंतवाडीतील मडूरा रोणापाल डिंगणे डेगवे तर दोडामार्ग मधील मोरगाव आडाळी कळणे या गावात प्रातिनिधिक स्वरूपात फिरून तेथील काजू बागायत्यांची पाहणी केली आहे .अनेक प्रगतशील शेतकरी स्वतःहून पंचनाम्या स्थळी दाखल झाले . आडाळी गावामध्ये तर सरपंचांसह दहा-बारा युवा शेतकरी उपस्थित होते . अनेक बागाय त्यांमधील काजू मोहर ६० ते ७० टक्के करपून गेला असून उत्पन्न २० ते २५ टक्के येण्याची शक्यता सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी वर्तविली .किरकोळ काही बागा या ४०-५०% उत्पन्न मिळविणारे आहेत . मात्र त्यांची तीन ते चार वेळा फवारणी वगैरे झाली असून खर्चाच्या तुलनेने पिक परवडण्यासारखे नसल्याची खंत या शेतकऱ्यांनी व्यक्त केली .मात्र बहुतांशी शेतकरी हे नाउमेद झालेले आहेत कारण उत्पन्नच पंधरा ते वीस टक्के मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे .आणि अशावेळी प्रचंड उष्णतेत हलकासा पाण्याचा शिडकावा व्हावा त्याप्रमाणे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर वैभव शिंदे आणि त्यांचे सहकारी तसेच जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नाईक नवरे मॅडम जिल्हा कृषी उपविभागीय अधिकारी सावंतवाडी श्री अनिकेत कदम सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी श्री गोरे साहेब बांधा मंडल अधिकारी श्री भुईम्बर श्री सरगुरू कृषी पर्यवेक्षक श्री निकम इत्यादी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी या काजू बागायतींची पाहणी -निरीक्षण केले .डॉक्टर वैभव शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना बागेतच काही प्रात्यक्षिके काही नवीन किडी जंतू यांची जाणीव करून दिली .आम्ही शास्त्रज्ञ मंडळी आणि कृषी खाते आपल्या सोबतच आहोत कुठेही अन्याय केला जाणार नाही पारदर्शकतेने आमचे पंचनामे त्वरित शासनापर्यंत पोहोचविण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली .
