
दिनांक: २/१/२०२६
तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे
आजगाव:शिरोडा-सावंतवाडी मुख्य रस्त्यावर आजगाव येथे एका दुकानदारांकडून दुकानातील सामान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ठेवले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. याच दुकानांच्या शेजारी आंब्याचे एक जुने आणि जीर्ण झालेले झाड असून ते कोणत्याही क्षणी रस्त्यावर कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून येत्या १५ दिवसांत यावर ठोस कारवाई न झाल्यास २६ जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते नितीन कळगुटकर आणि ग्रामस्थांनी दिला आहे.
श्री कंळगुटकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, आजगाव येथील वाहतुकीस धोकादायक ठरणाऱ्या संबंधित दुकान चालकावर कारवाई करण्यासंदर्भात आजगावच्या सरपंचांनी ६ ऑगस्ट २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १, सावंतवाडी यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते.
उपसरपंच सुशील शशिकांत कामटेकर यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. परंतु या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठलाही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणामुळे दोन वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्या ठिकाणी असलेले आंब्याचे झाड अगदी जीर्ण झाले असून या परिसराच्या अगदी जवळ आजगाव केंद्र शाळा नंबर १ असल्याने येथून लहान शाळकरी मुलांची सतत वर्दळ असते, त्यामुळे हे झाड हटविणे तितकेच गरजेचे आहे. परंतु प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते नितीन कळगुटकर यांनी यासंदर्भात बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे. प्रशासनाच्या या ढिम्म कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यासाठी येत्या १५ दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत अतिक्रमण न हटल्यास आणि जीर्ण झाड न तोडल्यास २६ जानेवारी रोजी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाला त्याने दिला आहे.
