दिनांक: २३ डिसेंबर २०२५
सातार्डा प्रतिनिधि: संदीप कवठणकर
सातार्डा: सावंतवाडी,ता.२२:
महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना जोडणारा सातार्डा येथील पूल सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. या पुलावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यामध्ये कामानिमित्त जाणारे शेकडो युवक-युवती जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. पुलावर पडलेले महाकाय खड्डे आणि पुलाच्या मुख्य खांबांना गेलेले तडे यामुळे हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे स्थानिक प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही दखल घेतली जात नसल्याने सामाजिक कार्यकर्ते नितीन कळंगुटकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या ३० डिसेंबरपूर्वी पुलाची दुरुस्ती न झाल्यास सर्व ग्रामस्थांसह पुलावरील खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सध्या या पुलाची अवस्था पाहता वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः शाळकरी मुलांच्या आणि दुचाकीस्वारांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला असून, एखादी मोठी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. नितीन कळंगुटकर यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, पुलावरील खड्डे बुजवून तो तातडीने सुस्थितीत करावा आणि पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून तिथे आवश्यक त्या संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात. जर ३० डिसेंबरपर्यंत प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे स्थानिक जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, या इशाऱ्याने आता तरी संबंधित विभाग खडबडून जागा होणार का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

