
दिनांक: ५ डिसेंबर २०२५
बांदा प्रतिनिधी: वाफोली येथे इंडस् मनोरा (टॉवर) कंपनीने आपली मनमानी कारभार चालू केला असून या कंपनीने दूरसंचार निगम या कंपनीकडून वाफोली येथे भर वस्तीत टॉवर उभारण्याचे काम हाती घेतलेले होते. काम सुरू करून आठ दिवस झाले होते.ही बाब तेथील सतर्क स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आली.या बाबीची चौकशी केली असता ही इंडस दूरध्वनी मनोरा (टॉवर) कंपनी त्या जागेवर आपला मनोरा (टॉवर) उभारत आहे.हे माहित झाल्यावर गावातील रहिवाशांनी तसेच लगतचे कब्जेदार यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे चौकशी केली.मात्र असा कुठलाही प्रस्ताव आमच्या जवळ आलेला नाही अथवा पत्रव्यवहार झालेला नाही.असे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले.कंपनीच्या प्रतिनिधीशी ग्रामस्थानी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.मनोरा (टॉवर) उभारणीची कागदपत्रे पण कंपनीच्या प्रतिनिधींनी कडे मागितली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.त्या नंतर ग्रामस्थानी ग्रामपंचायत प्रशासनाकडे धाव घेतली.त्यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने आपल्या जवळ कोणतीही कागदपत्रे नमूद केलेली नाही. त्यावेळी गावातील जनतेला ग्रामपंचायत प्रशासनाने २७ नोव्हेंबर पर्यंत काम बंद ठेवण्याचे आश्वासन दिले.तसेच २७ तारीखला होणाऱ्या ग्रामसभेत निर्णय घेतल्यानंतरच काम चालू करावे तो पर्यंत काम बंद ठेवावे असे ग्रामस्थानी ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती केली.त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने इंडस कंपनीचे काम बंद पाडले.ग्रामपंचायत प्रशासनाने सविस्तर चौकशी केली असता हा मनोरा (टॉवर) सर्वे क्रमांक २२१ मध्ये उभारण्यास सुरवात केली.परंतु त्या जागेबाबत कोणतीही कागदपत्रे,संबंधित जागा मालकाचे संमतीपत्र, भाडेकरार,जागा अकृषीत (NA)वापराबाबत प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक असणारी कोणतेही कागदपत्रे सादर न करता कामास सुरवात केली होती.
तसेच वाफोली ग्रामपंचायत हद्दीत मनोरा (टॉवर) मंजूर झाल्याबाबत कोणतेही दस्तऐवज अर्जासोबत दिसून येत नाहीत. वाफोली गावात मनोरा (टॉवर) मंजूर झाल्यास कोणत्या ठिकाणी मनोरा (टॉवर) बांधण्यात येणार याबाबत कोणतीही कल्पना संबंधित विभागाकडून अथवा कंपनीकडून व जमीन मालकाकडून ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आलेली नाही.असेही ग्रामंचायतीने सदर सभेत माहिती नागरिकांना दिली.
याचाच अर्थ असा की ही कंपनी कोणतीही परवानगी न घेता आपला मनमानी कारभार चालवत गावच्या मधोमध हा मनोरा(टॉवर) उभारण्याचा प्रयत्न करत होती.हे गावातील नागरिकांच्या निदर्शनास येताच गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले. गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की हा मनोरा (टॉवर) गावाच्या मधोमध असल्याने गावातील जनतेच्या जीवाला भविष्यात अती रेडिएशन मुळे धोका निर्माण होऊ शकतो तसेच तेथील फळबागांना त्याचा फटका बसू शकतो.त्यामुळे गावातील जनतेने हा मनोऱ्याला(टॉवर)तीव्र विरोध केला आहे.गावातील नागरिकांचं म्हणणे आहे की आमचा मनोरा उभारण्यास (टॉवर) विरोध नाही तो असावा.मात्र गावात अशा सुविधा पाहिजेतच पण लोकांच्या जीवाशी खेळून असे जर का प्रकल्प येत असतील तर अशा प्रकल्पांना आमचा तीव्र विरोध असेल असे प्रकल्प गावच्या वेशीवर किंवा निर्जल स्थळी असावेत.मनोरा
(टॉवर) बांधायला जमीन मालकाच्या लगतच्या भागदारांचा अथवा कब्जेदारांचा तीव्र विरोध असून गावातील ग्रामस्थांनी हा प्रकल्प रोखून धरलेला आहे. त्यामुळे जमीन मालकाच्या आणि इंडस मनोरा (टॉवर) कंपनीच्या विरोधात गावातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत हा प्रकल्प बंद पाडलेला आहे.भर वस्तीत उभारण्यात येत असलेल्या मनोरा(टॉवर) विरोधात सरपंच,उपसरपंच,तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे या सभेत आश्वासन दिले आहे.
