
पाडलोस : अलिशाचा सत्कार करताना सरपंच सलोनी पेडणेकर. बाजूस रोशनी गावडे, राघोबा गावडे, ग्रामसेवक प्रतिभा आळवे व मान्यवर.
दिनांक: ३ डिसेंबर २०२५
बांदा : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राज्यस्तरावर स्थान मिळवणारी अलिशा राघोबा गावडे ही एकमेव विद्यार्थिनी ठरली असून पाडलोस गावासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. अलिशाने पुढे जाऊन राज्याचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा आहे. तिच्या यशात क्रीडा शिक्षक महेश नाईक आणि लवू बांदेकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे, असे प्रतिपादन उपसरपंच तथा शिवसेना (ठाकरे गट) सावंतवाडी तालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी केले.
न्यू इंग्लिश स्कूल, मडुराची विद्यार्थिनी व पाडलोस गावची मुलगी अलिशा गावडे हिची विभागीय शालेय हँडबॉल स्पर्धेत उत्तुंग कामगिरी केल्याने बदलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या कामगिरीबद्दल पाडलोस ग्रामपंचायतीतर्फे अलिशा, तिचे पालक तसेच क्रीडा शिक्षकांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला सरपंच सलोनी पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य रोशनी गावडे, ग्रामसेवक प्रतिभा आळवे, पाडलोस विकास सहकारी संस्थेचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, संचालक राघोबा गावडे, शाळा क्र. 1 चे शिक्षक विजय गावडे, अनिल वरक, तसेच रामचंद्र गावडे, जगदीश गावडे, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रतिनिधी श्री. गवस, संगणक परिचालक सोनाली सातार्डेकर, ग्रामपंचायत कर्मचारी आकाश गावडे, रेशन वितरक मयुरी कुबल, ग्रामसंघाच्या शीतल गावडे, आशासेविका विजया गावडे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
———-
महत्वाचे….
अलिशाने घराचे नाव उज्ज्वल केले
अलिशाच्या घरातही आनंदाचे वातावरण होते. तिच्या आजोबांनी भावनिक शब्दांत नातीचा गौरव करत, माझी नात गायन आणि खेळात नेहमीच पुढे आहे. तिची राज्यस्तरावर निवड झाली याचा मला अपार अभिमान वाटतो. आज आजोबांनी नाही, तर नात अलिशाने घराचे नाव उज्ज्वल केले, असे सांगत रामचंद्र गावडे यांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
.
