
दिनांक: १ नोव्हेंबर २०२५
शिरोडा प्रतिनिधी: शिरोडा, गांधीनगर येथील मिठागर ते डोंगरी, शेटयेडोंगरी या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या संदर्भात आज श्री सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने आमदार श्री दीपक भाई केसरकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी श्री सदस्य गजानन मोरजकर, श्री गोरखनाथ मठ समितीचे सचिव श्री. उदय गावडे, दिंगबर परब, अमित गावडे व अन्य जण उपस्थित होते.
या रस्त्यानजीक डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा च्यावतीने श्री समर्थ बैठक सभागृह असून १५०० अधिक श्री सदस्य दर आठवड्याला बैठकीसाठी येतात. या रस्त्याला लागूनच एका सत्पुरुषाची जिवंत समाधीचे स्थळ व श्री गोरखनाथ मठ (श्री दत्तमंदिर ) ही आहे. सदरचा हा रस्ता नदीच्या किनारी असलेल्या श्री क्षेत्र दांडेकर व श्री महालक्ष्मी मंदिरापाशीही जातो. या सर्व धार्मिक क्षेत्रात प्रतिवर्षी २० हून अधिक कार्यक्रम संपन्न होतात. शेजारील तिरोडा व नाणोस या गावातही जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होतो. अत्यंत खराब रस्त्यामुळे श्री सदस्य, भाविक भक्त व ग्रामस्थ यांना त्रास सहन करावा लागत आहे , असे निवेदन म्हटले असून या रस्त्याचे नुतनीकरण व मजबूतीकरण करण्यात यावे अशी विनंती आमदार केसरकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
