
दिनांक: २९ ऑक्टोबर २०२५
बांदा: २६ ऑक्टोंबर हा दिवस ऋषिकेशच्या जीवनातील अंतिम दिवस ठरला. गोव्यात बहिणीकडे भाऊबीजेची
ओवाळणी करून परतणाऱ्या विलवडे (ता. सावंतवाडी) येथील वीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला.ऋषिकेश बापूजी दळवी (वय २०,रा. फौजदारवाडी, विलवडे) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात बांदा-हसापूर मार्गावरील चांदेल (गोवा) येथे सायंकाळी उशिरा घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश हा दुपारी आपल्या गोव्यातील बहिणीकडे भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी गेला होता. बहिणीने केलेली ती ओवाळणीच त्याची शेवटची ठरली. सायंकाळी भाऊबीज करून घरी येत असताना मुसळधार पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी झाडाला धडकली.अपघात इतका भीषण होता की,ऋषिकेशचा जागीच मृत्यू झाला.ऋषिकेशने बारावीपर्यंतचे शिक्षण बांदा येथील खेमराज महाविद्यालयात पूर्ण केले होते. सध्या तो सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. या तरुणाच्या अकाली निधनाने विलवडे गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
