
दिनांक: ११ सप्टेंबर २०२५
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
यंदा झालेल्या अतिवृष्टी व अति ओलाव्यामुळे नारळ व सुपारी यांची प्रचंड प्रमाणात फळगळ झाली आहे. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने व त्यामुळे झाडांकडून अन्नद्रव्य शोषून न घेतल्याने असा प्रकार घडला आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे. तरी याकरिता तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाईचा परिस्थितीजन्य सकारात्मक अहवाल शासनाकडे पाठवण्यात यावा व इतर मागण्यांकरिता आज बांदा दशक्रोशीतील शेतकऱ्यांनी भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांच्या नेतृत्वात जिल्हा कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बढे यांची भेट घेत शेती विषयक इतर अनेक समस्या देखील मांडल्या.
यावेळी घाटमाथ्यावरील हवामान जमीन पाऊस जमिनीचे पोच कोकणातील परिस्थिती यामध्ये प्रचंड तफावत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कोकणातील आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी अशा फळ पिकांसाठी स्वतंत्र अनुरूप विकास आराखडा तयार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच शेतीपूरक अनेक अवजारे अद्याप पर्यंत अनुदानित करण्यात आलेली नसल्याचे शेतकऱ्यांनी उपसंचालक यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच भेडल्या माडाची पाने चोरट्या पद्धतीने शहराच्या ठिकाणी केवळ सजावटीसाठी पाठवण्यात येत असल्याने शेकरू सारख्या राज्य प्राण्याचे रहिवासाचे ठिकाण धोक्यात आल्याने त्यांच्याकडून नारळ बागायतीचे प्रचंड नुकसान करण्यात येते हे देखील निदर्शनास आणून देण्यात आले. शेततळ्याच्या आवरणाच्या प्लास्टिकचा दर्जा देखील ५०० मायक्रोन ठेवावा अशी देखील मागणी करण्यात आली.तसेच शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांबाबत उपसंचालक व संबंधित अधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बडे यांनी शेतकऱ्यांच्या सर्व समस्या समजून घेत,चर्चा करत त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. शेतकऱ्यांनी सुचवलेली सर्व अवजारे अनुदान अंतर्गत उपलब्ध करून दिली जातील. कोकण विभागाकरीता कृषी विषयक नवीन योजनांचा आराखडा लवकरच तयार करणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले व यावेळी शेतकऱ्यांनी सुचवलेली सर्व अवजारांची नोंद घेत ती अवजारे या आराखड्यात अनुदानाखाली उपलब्ध करून देण्याचे देखील आश्वासन दिले. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी करता येत्या आठ दिवसात प्रत्यक्ष पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश देणार असल्याचे देखील सांगितले. शेततळ्याचे आवरणाच्या प्लास्टिकचा दर्जा ५०० मायक्रोन ठेवला जाईल. तसेच भेडल्या माडांच्या व शेकरू तसेच अन्य जंगली प्राण्यांच्या समस्येबाबत वनविभागाला सूचित केले जाईल. असे देखील स्पष्ट केले.
यावेळी भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, जयेश कृष्णा सावंत, शरद भीमसेन सावंत, चंद्रकांत अनंत भिसे,आनंद विठ्ठल वसकर, दिनेश वामन देसाई, राजेंद्र सूर्यकांत सावंत,नारायण वामन प्रभू शिरोडकर, सौरभ सुभाष सिद्धये, डॅनी अल्मेडा यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते
———————————————–
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नारळ सुपारीच्या शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. तसेच या सोबतच नारळ व सुपारी ही फळपिके हवामानावर आधारित विमा संरक्षणाखाली यावीत यासाठी व शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांसाठी पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांना भेटून निवेदनाद्वारे विनंती करणार आहे.
गुरु कल्याणकर
भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष
