आताच शेअर करा
साईप्रसाद काणेकर.

दिनांक: २० जून २०२५

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर


    तेरेखोल नदीत गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूचा उपसा करण्यात आला. त्यामुळेच पहिल्या पावसात बांदा शहरात पूरस्थिती निर्माण होऊन आळवाडी कट्टा कॉर्नर रस्ता पाण्याखाली गेला. याला पूर्णपणे जबाबदार हे प्रशासन असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे बांदा शहर प्रमुख तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी केला आहे.
    तेरेखोल नदी पात्रात गाळ उपसा करण्याच्या कामाचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात जिल्हा प्रशासनाने केला होता. मात्र गाळ काढण्याच्या नावाखाली केवळ आर्थिक मलिदा लाटण्यासाठी वाळूचा बेसुमार उपसा करण्यात आला. पाऊस तोंडावर आला असताना देखील गाळ हा त्याचठिकाणी ढीग मारून ठेवण्यात आला. याकडे प्रशासनाने जाणून-बुजून दुर्लक्ष केले.
    जर गाळ काढण्याचे काम पारदर्शक करण्यात आले असते तर बांदा शहरात पूरस्थिती उद्भवण्याचा प्रश्नच निर्माण झाला नसता. काल झालेल्या पहिल्याच पावसात शहरातील कट्टा कॉर्नर आळवाडी रस्ता पाण्याखाली गेला होता. जर गाळ पुरेशा प्रमाणात काढला गेला होता तर पूरस्थिती का निर्माण झाली याचे उत्तर प्रशासनाने जनतेला द्यावे असा सवाल श्री काणेकर यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed