आताच शेअर करा

सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर

दिनांक: २९ मे २०२४

अनेक संकटांना सामोरे जात जीवन जगत असलेली निराधार वृद्धा. त्यात उत्पन्नाचे काही साधनच असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट. अशा विदारक परिस्थितीत गेल्या पाच वर्षा पासून झोपडी वजा घर डागडुजीच्या प्रतीक्षेत. याची दुरुस्ती न केल्यास येत्या पावसाळ्यात अनर्थ निश्चित. त्यामुळे या निराधार वृद्धेची झोपच उडाली असून हा आसरा दुरुस्त करण्यासाठी कोणी मदत करेल का? या प्रतीक्षेत ही वृद्ध महीला आहे.
ही करूण कहाणी आहे कोलगाव – मारुती मंदिर नजीक राहत असलेल्या लक्ष्मी विठ्ठल दळवी (७२) या निराधार वृद्धेची. मूळचे रेडी येथील दळवी ५० वर्षां पूर्वी कोलगावत आले. त्यावेळी त्यांचे पती विठ्ठल दळवी हे सावंतवाडीत कपडे शिवत होते. त्यांचे २५ वर्षां पूर्वी निधन झाले. पतीच्या पश्चात स्वतःला सावरत लक्ष्मी यांनी काबाड कष्ट करुन आणि पोटाला चिमटा काढत चंद्रशेखर आणि देवीदास या दोन्ही मुलांचा सांभाळ करून त्यांना शिक्षणही दिले. पुढे चांगले दिवस येतील या आशेने स्वप्न पाहतानाच पती पाठोपाठ पाच वर्षानंतर मोठा मुलगा चंद्रशेखर याच्या आकस्मित निधनाने या माऊलीला धक्काच बसला. मात्र पती व पुत्र वियोगातून स्वतःला सावरत दुसरा लहान मुलगा देवीदास हा पुढे आपला आधार बनेल या मोठ्या आशेने इच्छा नसतानाही नवीन जीवनाला सुरुवात केली. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. पुढे झाले ही तसेच आणि मुलगा देवीदास याचेही आठ वर्षांपूर्वी आकस्मित निधन झाले. आणि या माय माऊलीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर गेली आठ वर्षे अनेक संकटांना सामोरे जात आणि परिस्थितीशी दोन हात करीत ही वृद्धा कसेबसे दिवस काढत आहे. दरम्यान या वृद्धेला सावंतवाडीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माया चिटणीस आणि कारिवडेचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी या वृद्धेला मदत केली.
सध्या या निराधार वृध्देसमोर निवाऱ्याचा मोठा प्रश्न आहे. या वृद्धेच्या पायालाही सध्या जखम झाली असून त्या वेदनांपेक्षा डोक्यावरचे छप्परच धड नसल्यामुळे पावसाळ्यात काय होणार? या काळजीने या वृध्देची सध्या झोपच उडाली आहे. येत्या पावसाळ्यात कोणत्याही क्षणी या वृद्धेच्या डोक्यावरचे छप्पर कोसळण्याची स्थिती आहे. यासाठी मदतीच्या प्रतिक्षेत असलेली ही वृद्धा आपल्या घराच्या दारासमोरच बसून आहे. या वृद्धेच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दातृत्वाच्या समाज मनाची गरज आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्यांनी जमेल त्याप्रमाणे तसेच स्वयंसेवी संस्था आणि दात्यानी या वृध्देला मदतीचा हात दिल्यास तिच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे. सर्व वाचकांना विनंती आहे. आपल्याला जमेल तशी ह्या वृद्ध महिलेला मदत करावी. व सहकार्याची भावना दाखवावी असे ज्येष्ठ सामजिक महीला माया चिटणीस, सामजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर आणि कोकण व्हिजन न्यूज चॅनेलच्या माध्यमातुन करण्यात येत आहे.
नाव – लक्ष्मी विठ्ठल दळवी बँक – स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा – सावंतवाडी. आय एफ एस सी कोड- ४७६. सि आय एफ नं ८५७५३४१५७६७. खाते नं – ३११०८६२२२९४ आणि अधिक माहितीसाठी माया चिटणीस ९४२३३१५०२३ यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *