दिनांक: ६ फेब्रुवारी २०२५
सावंतवाडी (प्रतिनिधी)
पौराणिक आणि ऐतिहासिक कथानकांमधील आख्यायिका आपल्या नाटकांमधून सादर करतानाच नव्या वांडमय कथानकांमधील विषय निवडून नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ, मळगांव ने गेल्यावर्षी सुरु केलेल्या ट्रिकसीनयुक्त बाळूमामा या नाटकाचा शंभरावा प्रयोग आज होत आहे.सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांसहीत गोवा,मुंबई, कोल्हापूर मध्ये कंपनीचे मालक तथा दशावतार कलाकार नितीन आसयेकर यांनी बाळूमामा हि आगळी वेगळी भूमिका साकारुन दशावतार नाट्य प्रकारात नवा अविष्कार घडवला आहे.मागील वर्ष 2023-24 या वर्षी या कंपनीची स्थापना झाल्यापासून ते चालू वर्ष 2024-25 मध्ये मालक नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार कंपनीने संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारीत हा नवा अविष्कार सादर करुन मागील एकाच वर्षात तब्बल प्रयोग सादर करण्याचा विक्रमही आपल्या नावावर रचला आहे.तर या वर्षी नितीन आसयेकर यांनी संत कबीर हा ट्रिकसिनयुक्त नाटकाद्वारे एक दर्जेदार अविष्कार घडून आणला असून संत कबीर या नाटकाला रसिकांची पसंती प्राप्त झाली आहे.
विविध दशावतार नाट्य मंडळामधून राजकर्ता,राजपुत्र,मच्छिंद्रनाथ,कानिफनाथ अशा विविध भूमिका अनेक दशावतार नाट्यमंडळांमधून सादर करता करता वर्ष 2014 ते 2022 या अवघ्या सात वर्षात नितीन आसयेकर यांनी दशावतार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. नितीन आसयेकर यांनी या कालावधीत आपल्या सुस्वर आवाजात सुमधुर गायन करतानाच आपल्या विनोदी, हास्य, करुण अभिनयाने दशावतार नाट्य प्रेमींना मंत्रमुग्ध केले त्यांना अनेक ठिकाणी बक्षिसे,पुरस्कार व सत्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.गेल्यावर्षी सुरु केलेल्या श्री संत बाळूमामा या नाटकाविषयी बोलताना नितीन आसयेकर सांगतात, ” बाळूमामा” हा प्रयोग व्हावा हि बाळूमामांची इच्छा त्यांच्या कृपेनेच हा नाट्य प्रयोग यशस्वी होत आहे.तर आपल्या दशावतार क्षेत्रातील कारकिर्दी बाबत बोलताना , दशावतार नाटकातील व्हिलन तसेच अमात्य आदि भूमिकांद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित गोवा व मुंबई येथे ठसा उमटवलेले त्यांचे काका बाबुराव आसयेकर व वडील रामा आसयेकर यांच्या कडून दशावतार कलेचे धडे गिरवून आपला वेगळा ठसा आपण उमटवू शकलो असे सांगितले.
नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार कंपनीच्या आजचा शंभरावा प्रयोग मळगांव या आपल्या गावातच सादर होत असल्याने मला आनंद होत आहे सांगताना तमाम दशावतार चाहते, हितचिंतक, मित्र परिवार, नातेवाईक यांचे आभार व्यक्त केले.