
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
दिनांक:३० जानेवारी २०२५
शिवजयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मुलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये चित्रकला, रंगभरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोवाडा स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा अशा विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. लहान मुलांच्या कळगुणांना वाव मिळण्यासाठी ही संस्था दर वर्षी विविध स्पर्धा घेत असते. चित्रकला स्पर्धा ही रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी अटल बिहारी वाजपेयी उद्यान बांदा होणार आहे. अंगणवाडी ते इयत्ता पहिली, इयत्ता दुसरी ते इयत्ता चौथी, इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी व इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी अशा चार गटात ही स्पर्धा होणार आहे.
यात अंगणवाडी ते पहिली गटासाठी रंगभरण तर इतर गटासाठी ‘शिवरायांच्या जीवनातील प्रसंग’ हा विषय ठेवण्यात आला आहे. ही स्पर्धा सायंकाळी ठीक ४ वाजता सुरु होईल.
शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता येथील बांदा केंद्रशाळेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता दुसरी ते चौथी गटासाठी ‘स्वराज्याचे शिलेदार बाजीप्रभू देशपांडे’ हा विषय ठेवण्यात आला आहे. इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी गटासाठी ‘संस्काराचे व्यासपीठ राजमाता जिजाऊ’ आणि ‘शिवरायांचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक’ हे विषय ठेवण्यात आले आहेत. तर इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी या गटासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज व कोकण प्रांत’ आणि ‘शिवाजी महाराजांचा आरमार विषयी दृष्टिकोन’ हे विषय ठेवण्यात आले आहेत. यासाठी वेळ मर्यादा ही दुसरी ते चौथी गटासाठी ४ ते ५ मिनिटे, पाचवी ते सातवी गटासाठी ५ ते ६ मिनिटे आणि आठवी ते दहावी गटासाठी ६ ते ७ मिनिटे ठेवण्यात आली आहे.
रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी, सातवी ते दहावी या गटासाठी पोवाडा व शिवगीत गायन स्पर्धा ठेवण्यात आली आहे. बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी शिवजन्मोत्सव व सायंकाळी पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी, सातवी ते दहावी या गटासाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी केदार कणबर्गी (मो. 9422394075), संकेत वेंगुर्लेकर (मो. 9011107562) किंवा शुभम बांदेकर (मो. 9403489568) यांच्याशी संपर्क साधावा.
