आताच शेअर करा

सिंधुदूर्ग संपादकीय

दिनांक: २९ जानेवारी २०२५

मोडी लिपी संवर्धन व सुलेखन कलेतील अद्वितीय कामगिरीबद्दल भारत सरकार तर्फे देण्यात येणारा पद्मश्री किताब अच्युत पालव यांना जाहीर झाला.
कोकण ही कलाकारांची भूमी असून कोकण कोकणाने आजवर कला क्षेत्राला अनेक अमूल्यरतने दिली आहेत त्यापैकी एक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार व मोडी लिपी अभ्यासक श्री अच्युत पालव हे होय.
सुलेखन कलेत जागतिक पटलावर भारताला ओळख प्राप्त करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. केवळ सुलेखन कलाच नव्हे तर महाराष्ट्रात लोप पावत चाललेली मोडी लिपी कलेच्या माध्यमातून पुनर्जीवित करण्याची महत्त्वाची कामगिरी श्री अच्युत पालव यांनी पार पाडली आहे.
श्री अच्युत पालव यांचे कलाशिक्षण मुंबई येथील सर जेजे उपयोजित कला महाविद्यालय येथून पूर्ण झाले त्यानंतर त्यांनी आपली संपूर्ण कारकीर्द मोडी लिपी संवर्धन व सुलेखन कलेसाठी वाहून घेतली अनेक आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात त्यांनी सहभाग नोंदवला असून अनेक आंतरराष्ट्रीय सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले आहे.
आपल्या चाळीस वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये त्यांनी कॅलिग्राफी विषयक अनेक पुस्तकांचे लेखन व प्रकाशन केले आहे त्यापैकी अक्षरानुभव, अक्षराकृती, ऊर्जाक्षरे, देवनागरी-काना मात्रा वेलांटी, वर्ल्ड ऑफ कॅलिग्राफी, लेट्रोस्पेक्टिव्ह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत.
तसेच मुंबई येथे “अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी “ ही कॅलिग्राफीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणारी संस्था त्यांनी सुरू केली आणि आजमितीला देश विदेशातील विविध विद्यार्थी तेथे कॅलिग्राफीचे शिक्षण घेताना दिसतात.
सावंतवाडी येथील बी एस बांदेकर कला महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. तसेच विद्यार्थ्याना वेळोवेळी बहुमोल मार्गदर्शन करण्याचे काम त्यांच्याकडून नेहमीच होत असते. कलाक्षेत्रात पद्मश्री प्राप्त झालेल्या अच्युत पालव यांचे बी एस बांदेकर कला महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष श्री रमेश भाट, प्राचार्य श्री उदय वेले तसेच सर्व अध्यापक वर्ग विद्यार्थी यांजकडून अभिनंदन करण्यात आले. तसेच कलाक्षेत्रातील पुढील योगदानासाठी व भावी वाटचालीसाठी त्याना शुभेच्छा देण्यात आल्या.
सध्या त्यांचे अक्षर भारती हे कला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे दिनांक २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. कलारसिकनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed