
तळवणे प्रतिनिधी : शंकर गावडे
दिनांक: ८ जानेवारी २०२५
दिनांक 08/01/2025 रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय ‘शालेय बाल कला,क्रीडा व ज्ञानी होणार महोत्सवात’ लहान गट समूह नृत्य प्रकारात आरोंदा खेमराज शाळेने घवघवीत यश मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. ‘’बेटी बचाव’ या थीम अंतर्गत असलेला हा नृत्य प्रकार केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक मिळवत बीट स्तरावर सहभागी झाला. बीटस्तरावर ही या शाळेने प्रथम क्रमांकाची विजयी पताका रोवली. आणि आता तालुकास्तरावर ही प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. केवळ सहा पटसंख्या असणाऱ्या या शाळेने अपार मेहनतीच्या जीवावर आणि सर्वांच्या सहकार्याने हे यश संपादन केले आहे.
शाळेची पटसंख्या केवळ सहा असल्यामुळे इतर मुले आजूबाजूच्या शाळेतून घ्यावी लागली, त्यासाठी आरोंदा नं. १ शाळेचे मुख्याध्यापक श्री. गणपत गावडे सर, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका यशस्वी तावडे मॅडम,आरोंदा मानसी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पांडुरंग पाटील सर तसेच तळवणे नं. ४ शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद झेंडे सर या सर्वांनी तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी खूप सहकार्य केले.सदर नृत्य बसवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या शिक्षण तज्ञ सौ. श्रेयसी पावसकर आणि ईश्वरी कुडाळकर यांनी अपार मेहनत घेतली.
इतक्या कमी पटसंख्येच्या शाळेने इथपर्यंत मजल मारल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदीप स. निऊंगरे सर, उपशिक्षक श्री. भगवान कृ. पारधी सर व सर्व मुलांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आरोंदा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री लक्ष्मीदास ठाकूर सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. तनुजा नाईक व सर्व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
