आताच शेअर करा

सावंतवाडी प्रतिनिधी :विशाल गावकर

ता: २५एप्रिल२०२४ 

मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेच्यावतीने गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळ बांबर्डे आणि रोणापाल येथील अनाथांच्या दोन वस्तीगृहासह सावंतवाडीतील आयुर्वेदिक कॉलेजला सुमारे २ लाख २० हजार रुपयाचे उपयोगी साहित्य प्रदान केले.समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो नव्हे ती आपली जबाबदारी आहे, या सामाजिक जाणिवेतून  तसेच “मानव सेवा, हीच ईश्वर सेवा” या भावनेतूनच या समाजसेवी संस्थेने ही मदत केली आहे.


           योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक मास्टर चोआ कॉक सुई यांच्या महासमाधी मासानिमित्त या साहित्याचे गरजूंना वितरण करण्यात आले. गेल्यावर्षीही असेच उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात या संस्थेच्यावतीने राबविण्यात आले होते. समाजातील खऱ्याखुऱ्या गरजवंतांचा शोध घेऊन ही मदत केली जात असल्यामुळे संस्थेची ही मदत खऱ्या अर्थाने सार्थकी लागणार आहे. उल्लेखनीय म्हणजे मुंबई येथील ही सामाजिक संस्था आपल्या कार्यक्षेत्रात विविध उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासत असताना कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात गरजूंना मदत करत आहे. यापुढेही जिल्हयात गरजवंत समाजासाठी विविध उपक्रम राबविण्याचा या संस्थेचा मानस आहे.

या मदतीचा महत्त्वाचा दुवा
डॉ प्रवीणकुमार ठाकरे टीम

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे  आणि त्यांचे सहकारी गेली अनेक वर्षे निस्वार्थी भावनेने शहरासह ग्रामीण ते अति दुर्गम भागात सातत्याने आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबवतात. तसेच आपल्या परिचयाच्या अनेक स्वयंसेवी संस्थांच्या विविध उपक्रमाचा लाभ ते गरजवंतांना मिळवुन देतात.  त्यामुळे डॉ प्रविणकुमार ठाकरे  गोरगरीबांसह गरजवंतांचे आश्रयदाते बनले आहे. त्यामुळे योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई ही संस्थाही डॉ प्रवीणकुमार ठाकरे यांच्या माध्यमातून गेल्यावर्षांपासुन जिल्ह्यात कार्यरत आहे. या संस्थेचे ध्येय पाहता यापुढेही योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजूंना मिळवुन देण्याचा मनोदय डॉ प्रविणकुमार ठाकरे यांनी व्यक्त केला.
           यावर्षीही या संस्थेद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “एम फॉर सेवा” संस्थेच्या सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल येथील दयासागर वस्तीगृहास सुमारे ५०  हजार रुपये किंमतीचे धान्य, मसाले, तेल व इतर भोजन सामुग्रीसह साबण, पेस्ट आदी साहित्य देण्यात आले. तसेच कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील शोषित मुक्ती अभियान संस्था संचालित नाग्या महादू कातकरी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना छत्री, शैक्षणिक व स्वच्छतेचे असे सुमारे ५० हजार रुपयांचे साहित्य देण्यात आले. तसेच सावंतवाडी येथील राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय संलग्नित रुग्णालयास मल्टि पॅरा मॉनिटर व सिरिन्जपंप असे सुमारे १ लाख २० हजार रुपयांचे रुग्णपयोगी आवश्यक असे साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी दयासागर वस्तीगृहाचे जिवबा वीर, नाग्या महादू वस्तीगृहाचे उदय आईर, राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे विश्वस्त डॉ मिलिंद खानोलकर, कार्यवाह बाळासाहेब बोर्डेकर, प्राचार्य डॉ विकास कठाणे यांनी योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेचे आभार मानले.
           यावेळी क्रियान्वयन फाउंडेशनच्या सेवाभावी कार्यकर्त्या डॉ मुग्धा ठाकरे, शोभा कविटकर, श्वेता धोंड, अँड्र्यू फर्नांडिस, डॉ प्रविणकुमार ठाकरे,
दयासागर वस्तीगृहाचे जिवबा वीर, नाग्या महादू वस्तीगृहाचे उदय आईर, राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे विश्वस्त डॉ मिलिंद खानोलकर, कार्यवाह बाळासाहेब बोर्डेकर, प्राचार्य डॉ विकास कठाणे, डॉ संजय दळवी, डॉ नंददीप चोडणकर, भार्गवराम शिरोडकर, करुणा गावडे, सुहास गावडे आदी उपस्थित होते.

ता: २५ एप्रिल २०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed