
न्हावेली:प्रतिनिधि
दिनांक:२७ ऑगस्ट २०२४
गणेशमूर्ती शाळा जागू
न्हावेली / वार्ताहर
अवघा १० दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने जिल्ह्यातील परंपरागत मूर्तीकरांच्या शाळा रात्री गजबजू लागल्या आहेत.जुलै महिन्यात पावसाचे दमदार आगमन झाल्यानंतर आता शेतीची कामे ओटोपून मूर्तिकारांनी गणेशोत्सवाची तयारी सुरु केली आहे.अवघे काही दिवस राहिल्याने सद्या गणेश मूर्तिशाळांमध्ये मूर्ती रंगकाम करण्याची लगबग सुरु झाली आहे.
बाप्पाचे आगमन होणार असल्याने जिल्ह्यातील गावोगावच्या पारंपरिक गणेश मूर्तिशाळांमध्ये गजबजाट सुरु आहे.काही मूर्तिकारांनी पेण येथील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती मे महिन्यापासून आणून ठेवल्या आहेत.तर मातीच्या मूर्ती बनविण्यासाठी कामे युद्धपातळीवर सुरु आहेत.त्यात साचातील व हाती मूर्ती बनवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भक्तांच्या आवडीच्या गणेश मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकार मेहनत घेत आहेत.पारंपारिक मातीबरोबर शाडू मातीला मागणी वाढली असून किमतीत वाढ झाली आहे.सद्या मातीच्या मूर्तीना पारंपारीक कलर काम सुरु असले तरी हिरेजडीत मूर्ती कापडी वस्र अशा अनेक नवनवीन कलाकुसरी पहावयास पसंती मिळत आहेत.रंग साहित्य व अन्य साहित्याच्या किंमतीही कमालीच्या वाढत्या आहेत.
कामगारांच्या मजुराचे दर वाढले असले तरी कुशल कारागीर मिळणे कठीण झाले आहे.त्यात अनेक समस्यांच्या गर्तेत हा व्यवसाय सापडला असला तरी पारंपारिक मूर्तीकार आजही हा व्यवसाय टिकवून आहेत.जिल्ह्यात गावोगावी गणेश मूर्तिशाळा असून मूर्तिकार माती मळण्यापासून ते रंगकामापर्यत सर्व कामे कुटुंबीयांसह करताना दिसून येतात.काही मूर्तिकारांची मुंबईस्थित घरातील मंडळीही काही दिवसात दाखल होणार आहेत.त्यात सद्या पेणमधील गणेश मूर्तीसह शाडूच्या मातीच्या मूर्तीना मागणी वाढत आहे.मात्र इंधन दरवाढ कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने मूर्तीच्या किमती वाढल्या आहेत.गणेश मूर्तीशाळांमध्ये रात्रंदिवस कामात व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
