
न्हवेली : प्रतिनिधि
दिनाक: २६ ऑगस्ट २०२४
मळगाव शारदा विद्यालय रस्ता शाळेच्या पटांगणाच्या पेवर ब्लॉक व रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम पूर्ण : संतोष गायके
न्हावेली / वार्ताहर
पुणे येथील श्री गणेश पॅकेजिंगचे मालक श्री संतोष गायके यांच्या दातृत्वातून श्री गायके यांच्या शाळेसाठी दिलेल्या ८५१०० रुपयांच्या भरीव देणगीतून शाळेच्या पटांगणास पेवर ब्लॉक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्टचे काम पूर्णत्वास आले. या शाळेचे माजी विद्यार्थी श्री केतन नार्वेकर यांच्या इच्छाशक्तीमुळे त्यांनी गायके यांना केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे शाळेला ही मदत प्राप्त झाली आहे. गायके यांच्या या दातृत्वाचे मळगाव पंचक्रोशीतून विशेष कौतुक होत आहे. यापूर्वीही गायके यांनी ५११५१ ची देणगी शाळेला प्रदान केली होती. या देणगीतून शाळेच्या संगणक कक्षाचे काम पूर्ण करण्यात आले होते.
८५१०० रुपये देणगी प्रदान करताना गायके यांनी पेवर ब्लॉक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करून स्वातंत्र्य दिनी शाळेतील मुलांना यावर उभे राहून परेड देता आली पाहिजे, अशी इच्छा प्रकट केली होती. त्यांच्या या जबर इच्छाशक्तीमुळेच दोन दिवसांपूर्वीच हे काम पूर्णत्वास आले. उद्या स्वातंत्र्य दिनी शाळेतील मुले यावर उभी राहून परेड देत स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत. या दातृत्वाबद्दल गायके यांचे शाळेच्यावतीने शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे व शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर यांनी विषेध आभार मानले. यापुढेही शाळेला इतरही काही आवश्यक गोष्टींची मदत लागल्यास आपण ती नक्की करू, असे आश्वासनही गायके यांनी दिले.
