सिंधुदूर्ग :संपादकीय
दिनांक: ३१ जुलै २०२४
रोणापाल जंगलात सापडलेल्या अमेरिकन महिलेच्या जबाबवरून तिचा पती सतीश एस याने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने बांदा पोलिसात सोमवारी रात्री उशिरा त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला. बांदा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेक्षण विभागाची दोन संयुक्त पथके तामिळनाडू येथे आज पोहोचली असून स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग पोलीस पथक मुख्य संशयिताच्या मागावर आहे. आज बांदा पोलिसांनी दुपारी घटनास्थळी जात पुन्हा एकदा ‘ईन कॅमेरा’ पाहणी केली. यावेळी महिलेकडे सापडलेला मुद्देमाल आज बांदा पोलिसांनी ताब्यात घेतला.
रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या त्या अमेरिकन महिलेचा काल बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी गोवा बांबोळी रुग्णालयात जाऊन जबाब नोंदविला. जबाबात तिने आपला पती सतीश (पूर्ण नाव समजले नाही) याने आपल्याला जीवे मारण्यासाठीच याठिकाणी आणून जंगलात बांधून ठेवल्याची माहिती दिली. तिची प्रकृती आता सुधारत असून तिच्या बंद झालेल्या जबड्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले आहेत. तिच्या प्राथमिक जबाबावरून तिच्या पतीविरोधात सोमवारी रात्री उशिरा बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्याने पतीला ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान आता पोलीसांसमोर आहे. सिंधुदुर्ग पोलिसांची दोन पथके तिच्या तामिळनाडू येथील मूळ पत्त्यावर तपासाकामी गेली असून पतीला जेरबंद केल्यानंतरच या प्रकरणाची सत्यता समोर येणार आहे. तर पतीला ताब्यात घेतल्या वर त्या महिलेला कधी व कशी बांधण्यात आली हे देखील उलगडणार आहे.
अमेरिकन दुतावासाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेक्षण विभागाची संयुक्त पथके अधिक तपासासाठी गोवा व तामिळनाडू येथे गेली आहेत. तामिळनाडू येथे तपासासाठी गेलेल्या पथकाला काही महत्वाचे धागेदोरे सापडल्याने बांदा पोलिसात सोमवारी रात्री उशिरा मुख्य संशयिताविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.
आज दुपारी तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले होते. त्याठिकाणी पंचांच्या साक्षीने परिसराची कसून तपासणी करण्यात आली. ही तपासणी ईन कॅमेरा करण्यात आली. त्यावेळी महिलेचा काही मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
सुरुवातीला सावंतवाडी पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल अधिक तपासासाठी आज बांदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. महिलेकडे सापडलेल्या दोन सॅक, काही वस्तु बांदा पोलिसांनी पंचनामा करत ताब्यात घेतल्या.