आताच शेअर करा

दिनांक:१६/११/२०२६

आवळेगाव  : दिवाळीची सांगता होताच तळकोकणात वार्षिक जत्रोत्सवांना सुरुवात होते. कुडाळ तालुक्यातील आवळेगावचे ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिरात होणारा ‘दहीकाला’ अर्थात जत्रोत्सव हंगामाच्या शुभारंभाची यात्रा असते. कार्तिक प्रबोधिनी एकादशी दिनी हा जत्रोत्सव होतो.

यावर्षी शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी हा जत्रोत्सव होणार आहे. यानिमित्त मंदिर परिसरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी मिरवणूक, ओटीचा भरणे व रात्री दशावतारी नाटक होणार आहे. श्री देव नारायण मंदिराशेजारी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर असून कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त मंदिरात विविध उत्सव साजरे करण्यात येणार आहेत.

सकाळी ८ वाजता श्रींच्या मूर्तीवर अभिषेक होऊन उत्सवाला प्रारंभ होईल. सकाळी १० वाजता यावेळी दर मंदिर ते नारायण मंदिर अशी पायी दिंडी काढण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता हरिपाठ होईल. त्यानंतर रात्री ११.३० वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार असून रात्री १२.३० वाजता खानोलकर दशावतार कंपनीचे दशावतारी नाटक (दहीकाला) सादर होणार आहे.

ही जिल्ह्यातील पहिलीच यात्रा असल्याने आवळेगांव  दशक्रोशीतून जिल्ह्यातील भाविक आणि दशावतारी नाटकांचे हौशी आवर्जून या जत्रोत्सवास हजेरी लावतात. या निमित्त आवळेगावातील सर्व घरे सडा रांगोळ्यांनी  सजविली जातात. जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून तुळशी विवाहांना प्रारंभ होत असल्याने  उसांच्या वाडांची मोठ्या प्रमाणात विक्री होते.

मुंबई, पुणे परदेशात येथे नोकरीनिमित्त असलेले आवळेगाववासी चाकरमानी या यात्रेला आवर्जून उपस्थिती दर्शवितात. दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी तुळशी विवाह होणार आहे. या जत्रोत्सवापासून जिल्ह्यातील गावोगावच्या जत्रोत्सवांना सुरुवात होते. याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन मानकरी, देवस्थान कमिटी व आवळेगाव ग्रामस्थ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed