आताच शेअर करा
फोटो:-
रियाज खान

दिनांक: ०८/०९/२०२६
    बांदा: बांदा ग्रामपंचायतीमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून ग्रामसेवक अथवा ग्रामविस्तार अधिकारी नसल्याने ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार प्रभावित झाला आहे. नागरिकांना विविध दाखले, परवानग्या तसेच विकासकामांशी संबंधित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे बांदा ग्रामपंचायतीमध्ये तातडीने पूर्णवेळ ग्रामसेवक अथवा ग्रामविस्तार अधिकाऱ्याची कायमस्वरूपी नियुक्ती करावी, अशी मागणी युवासेना तालुकाप्रमुख रियाज बशीर खान यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
    बांदा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठी व महत्त्वाची ग्रामपंचायत असून, ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांची अनेक दैनंदिन कामे ग्रामपंचायतीवर अवलंबून आहेत. मात्र, अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बांदा गावात चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होणार असून, या काळात ग्रामपंचायतीवरील प्रशासकीय कामाचा ताण आणखी वाढणार आहे. त्यामुळे तत्काळ अधिकारी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे खान यांनी म्हटले आहे.
    ग्रामपंचायतीचा कारभार अधिकारीविना आणखी किती दिवस चालविणार? नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने आणखी किती काळ दुर्लक्ष करायचे, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाढणारा कामाचा ताण लक्षात घेऊन आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
     ग्रामसेवकाची तातडीने नियुक्ती न झाल्यास नागरिकांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच लोकशाही मार्गाने पुढील संघर्ष उभारण्यात येईल, असा इशाराही रियाज खान यांनी निवेदनातून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *