
दिनांक: ०६/०९/२०२६
न्हावेली:- कोकणचा राजा आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांनी मोठ्या उत्साहात गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, न्हावेली येथील अंतर्गत ग्रामसडक योजनेच्या रस्त्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडीझुडपांमुळे वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. ही गंभीर समस्या ओळखून न्हावेली गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांनी तातडीने पुढाकार घेत या रस्त्यावरील वाढलेली झाडी साफ करून घेतली आहे. त्यांच्या या तत्परतेमुळे गणेशोत्सवासाठी गावात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आता सुकर आणि सुरक्षित झाला आहे.
न्हावेली अंतर्गतमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या या रस्त्याची देखभाल दुरुस्तीची मुदत (व्हॅलिडिटी) संपली होती. नियमानुसार, संबंधित कंत्राटदाराने या देखभाल मुदतीमध्ये रस्त्याची डागडुजी आणि दुतर्फा वाढणाऱ्या झाडीची सफाई करणे बंधनकारक होते. मात्र, कंत्राटदाराकडून ही कामे वेळेत पूर्ण केली गेली नव्हती. मुदत संपल्याचे कारण पुढे करत या कामाकडे दुर्लक्ष होण्याची चिन्हे होती. परंतु, गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणात गावातील रस्त्यांची ही दुरवस्था गावकऱ्यांसाठी आणि बाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी अपघाताला आमंत्रण देणारी ठरू शकत होती.
या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अक्षय पार्सेकर यांनी थेट संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व अभियंत्यांशी (इंजिनिअर्स) संपर्क साधला. त्यांनी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून तांत्रिक अडचणींवर मार्ग काढला. तसेच कंत्राटदाराशीही संवाद साधून देखभाल मुदतीदरम्यान प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण करणे कशी त्यांची जबाबदारी आहे, हे आग्रहाने पटवून दिले. पार्सेकर यांच्या या सातत्यपूर्ण आणि यशस्वी पाठपुराव्यामुळे अखेर यंत्रणेला जागे व्हावे लागले.
अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर कंत्राटदाराने तातडीने मजूर आणि आवश्यक यंत्रसामग्री लावून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली धोकादायक झाडीझुडपे कापून संपूर्ण रस्ता चकाचक केला. या रस्त्यावर अनेक ठिकाणी वळणे असल्याने वाढलेल्या झाडीमुळे समोरील वाहन दिसत नव्हते, ज्यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता. आता रस्ता मोकळा झाल्याने वाहनचालकांना समोरील मार्गाचा स्पष्ट अंदाज येत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर गावकऱ्यांची ही मोठी अडचण दूर केल्याबद्दल न्हावेलीतील ग्रामस्थ, वाहनधारक आणि मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांकडून अक्षय पार्सेकर यांचे मनःपूर्वक आभार मानले जात असून, त्यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
