
दिनांक: २९/०८/२०२६
बांदा: बिपरजॉय निसर्ग फयान तोक्ते सारख्या प्रचंड वादळाना तोंड देऊन संघर्ष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा उभा राहिला .उभारी घेत असताना ।काजूच्या बाजारभावापेक्षा कमी दरालाही यशस्वी तोंड देऊन त्याने बागा पुन्हा फुलविल्या .मात्र निसर्गाचा एक एक प्रहार शेतकऱ्यांवर चालूच आहे .पुन्हा कुठे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी स्थिरस्थावर होत असताना यंदाच्या कमी पावसामुळे व पुन्हा लहरी वातावरण म्हणजे क्षणात पाऊस व क्षणात ऊन म्हणजे प्रचंड हिट ( आक्टोंबर हिट ) यामुळे सुपारीच्या बागाना फटका बसला असून प्रचंड प्रमाणात सुपारी गळ होत आहे .गेली कित्येक वर्षे दापोली कृषी विद्यापीठाकडे मागणी करूनही विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यावर ठोस उपाय काढण्यास असमर्थ ठरले आहेत .लोकप्रतिनिधी आपल्याच इतर कार्यात मग्न असल्याने निदान शासनाचं कृषी खातं तरी याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा असताना शेतकऱ्यांनी विनंती करूनही अजूनही गळलेल्या सुपारीचे पंचनामे झाले नाहीत .याला शासनही तेवढेच जबाबदार आहे कारण कृषी खात्यामध्ये मागणी असतानाही कृषी कर्मचाऱ्यांची संख्या शासन वाढवत नाही .त्यामुळे एका एका कृषी कर्मचाऱ्यावर आठ दहा गावांची जबाबदारी असल्याने तेही काम ढकल करताना आढळत आहेत .अशा परिस्थितीत सुपारी बागायतदार मात्र हैराण झाला असून टू बी ऑर नॉट टू बी परिस्थिती निर्माण झाली आहे .पंचायत समिती व जिल्हा परिषद मध्ये असणारी कृषी खाती ही नाममात्र असून लोकप्रतिनिधी आपल्या इतर कामात मशगुल असून आपल्याला निवडून देणारे मतदार हे शेतकरी आहेत हेही ते विसरले आहेत .त्यामुळे शेतकऱ्यांची मदार ही संपूर्णता कृषी खात्यावर आहे .कृषी खात्याने याकडे त्वरित लक्ष देऊन सुपारी गळतीचे पंचनामे करावे अशी मागणी सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाने केली आहे .
