
दिनांक: ४/०८/२०२६
शिरोडा: शिरोडा परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या भटक्या कुत्र्यामुळे नागरिकांना उपद्रव सहन करावा लागत आहे या समस्येवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
शिरोडा बाजारपेठ बायपास रोड,मच्छी मार्केट,भाजी मार्केट या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून रात्रीच्या वेळी ये -जा करणाऱ्या पादचाऱ्यांवर तसेच दुचाकी वाहनधारकांवर हे भटके कुत्रे दहा पंधरा च्या गटाने पाठलाग करणे किंवा अंगावर धावून जाणे असे प्रकार घडत आहेत.याप्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच शिरोडा परिसरातील रहिवासी संकुलाच्या आजूबाजूला भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते रात्रीच्या वेळी हे भटके कुत्रे मोठ्या मोठ्याने भुंकल्याने संकुलातील रहिवाशांची झोप मोड होणे, निद्रानाश होणे अशा प्रकारची समस्या जाणवत आहे
सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकाला नुसार या भटक्या कुत्र्यांना ठार न मारता त्यांच्यावर निर्बीजीकरण मोहीम राबविणे आवश्यक असताना शासनाच्या या मोहिमेची शिरोडा परिसरात तरी कोणतीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. काही स्वयंसेवी संस्थांनी स्वखर्चाने ही मोहीम राबविण्याचा प्रयत्न केला होता.मात्र या मोहिमेला शंभर टक्के यश न आल्याने कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस
झपाट्याने वाढत आहे.
या भटक्या कुत्र्यांची एकत्र असण्याची ठिकाणेही शिरोडा भाजी मार्केट, मच्छी मार्केट, शिरोडा बस स्टॅन्ड तसेच अंगणवाडी, प्राथमिक शाळा, हायस्कूल या परिसरात आढळून येते या कुत्र्यांच्या अंगावर येण्याच्या प्रकारामुळे विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यास रेबीज सारखा जीवघेणा आजार या लहान मुलांना होऊ शकतो. तरी या गंभीर समस्येवर शिरोडा ग्रामपंचायत तसेच संबंधित विभागाने लवकरात लवकर तोडगा काढून शिरोडा परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक यांना भयमुक्त करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
