आताच शेअर करा
फोटो
पाडलोस : रस्त्याच्या बाजूला असलेले मगरीचे पिल्लू.

दिनांक: २४/०६/२०२६

बांदा : प्रतिनिधी
पाडलोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर परिसरात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. सुमारे दहा फूट लांबीची मगर दोन लहान पिल्लांसह मुख्य रस्त्यावर आढळून आली. अचानक समोर आलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. वाहनचालकांनी तत्काळ आपली वाहने थांबवून मगरींना सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला वळवले. सामाजिक कार्यकर्ते सागर गावडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सुनील गावडे, साहिल गावडे आणि जयराम (बाबलो) गावडे यांनीही या वेळी मदत करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दमदार पावसामुळे जलस्रोत भरून वाहत असून, वन्यजीवांचा वावर मानवी वस्तीकडे वाढत असल्याचे चित्र आहे. विशेषतः मगरींसारखे धोकादायक प्राणी रस्त्यावर येऊ लागल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने लक्ष घालून अशा मगरींचा बंदोबस्त करावा, तसेच संबंधित भागात नियमित पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *