आताच शेअर करा

दिनांक: २४/०६/२०२६

बांदा: वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने बांदा पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवार दिनांक 24 जून रोजी दिव्य ज्योती स्कूल, डेगवे प्रशालेत खास विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बांदा पोलीस निरीक्षक श्री. डी. बी.. पालकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास अकॅडेमी ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन चे संचालक श्री. मनोज मालवणकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमास दिव्यज्योती प्रशाळेचे इयत्ता नववी व दहावीचे   विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी श्री. मनोज मालवणकर यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे बदलते स्वरूप, ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, सायबर बुलिंग, फेक लिंक, फिशिंग, OTP व बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहितीची सुरक्षितता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
बांदा पोलीस निरीक्षक श्री. डी. बी. पालकर यांनी आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर करताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या संदेशांना प्रतिसाद न देणे, संशयास्पद लिंकवर क्लिक टाळणे तसेच वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर न करण्याचा सल्ला दिला. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० हेल्पलाइन किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमादरम्यान विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. मार्गदर्शन सत्र संवादात्मक व माहितीपूर्ण ठरले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होऊन डिजिटल माध्यमांचा सुरक्षित व जबाबदारीने वापर करण्याचा संदेश पोहोचला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस विभाग, अकॅडमी ऑफ कॉम्प्युटर एज्यूकेशन तसेच शाळा प्रशासन यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल व सुरक्षित डिजिटल भविष्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत प्रशाळेचे मुख्याध्यापक फादर रॉबिन, पालक वर्ग यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *