आताच शेअर करा

दिनांक: २२/०६/२०२६

सावंतवाडी प्रतिनिधी:दहावीच्या परीक्षेत सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याच्या गुणपत्रिका फेर तपासणीत तब्बल ४ गुणांची वाढ झाल्यामुळे त्याने जिल्ह्यात पाचव्या क्रमांकावरून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याचे ९९.८० टक्के झाले असुन अवघ्या एका गुणामुळे १०० टक्क्यासह त्याचा जिल्ह्यातील प्रथम क्रमांक हुकला आहे. मात्र आता मुलग्यांमध्ये त्याचा जिल्ह्यात पहिला क्रमांक आला आहे.
          सुरुवातीला ८ मे रोजी जाहीर झालेल्या निकालात कु. विराज राऊळ याला ५०० पैकी ४९५ गुण म्हणजेच ९९ % गुण मिळाल्याने त्याने सावंतवाडी तालुक्यात ३ रा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ वा क्रमांक पटकावला होता. मात्र या गुणांबाबत कु विराज राऊळ याला साशंकता होती. शिवाप दृढ आत्मविश्वास असल्याने त्याने उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीची मागणी केली. या फेरतपासणीत संस्कृत विषयात ३ गुण आणि भूगोल विषयात १ गुण मिळून त्याचे तब्बल ४ गुण वाढले. त्यामुळे आता त्याला ५०० पैकी ४९९ गुण म्हणजेच ९९.८० % गुण मिळाल्याने त्याचा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला आहे. तर या फेर तपासणीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलग्यांमध्ये तो सर्वप्रथम आला आहे. या फेरतपासणीसाठी त्याचे पालक तसेच मिलाग्रीसचे प्राचार्य व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.
        विराज राऊळ ने यापूर्वीही अनेक वेळा शैक्षणिक क्षेत्रात नावलौकीक मिळविला आहे. ५ वी तसेच ८ वी मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद (पुणे) मार्फत घेण्यात आलेल्या स्काॅलरशीप परिक्षेत त्याने सिंधुदुर्ग जिल्हा सर्वसाधारण गुणवत्ता यादीत स्थान मिळविले होते. तसेच इयत्ता ८ वी मध्ये विज्ञान प्रदर्शनात विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला होता. त्याला चित्रकलेचीही विशेष आवड असून हुबेहूब पेन्सिल पोट्रेट स्केच काढण्यात तो माहीर आहे. त्याने हार्मोनियमच्या सुद्धा तीन परीक्षा दिल्या आहेत.
           विराज राऊळ हा मूळचा मळगांवचा सुपुत्र असून ओटवणे हायस्कूलचे शिक्षक नंदकिशोर राऊळ यांचा मुलगा तर शिवसेना माजगांव जिल्हा परिषद मतदारसंघ विभागप्रमुख उमेश गांवकर आणि दैनिक तरुण भारतचे पत्रकार गावकर यांचा भाचा.. विराजच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *