आताच शेअर करा

दिनांक: १३/०६/२०२६

सावंतवाडी । प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना ते म्हणाले, “जीवनात निष्ठेला सर्वोच्च स्थान द्या आणि नेहमी साधेपणा जपा. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाल, तिथे इतके मोठे व्हा की तुमच्या माध्यमातून या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्पन्न आणि नाव दोन्ही वाढेल. ‘कामयाब नही, काबिल बनो’… स्वतःला इतके सक्षम व यशस्वी करा की दुनिया तुमच्या मागे येईल. स्वतःची कर्तृत्वाची रेषा अशी आखा जी कोणालाही पुसता येणार नाही, यासाठी निरंतर कार्यरत राहा, असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी केले.
     सकल मराठा समाज, सिंधुदुर्गच्या वतीने १० वी, १२ वीच्या परीक्षेत आणि विविध क्षेत्रांत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच मराठा समाजातील मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित राहून आ. निलेश राणे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले.
     ते म्हणाले, आज आम्ही जे व्यासपीठावर तुमचा गौरव करीत आहोत हे व्यासपीठ सहज मिळालं नाही. माझ्या स्वतःच्या आयुष्यातही मला मोठा संघर्ष करावा लागला. अनेक अपयशांचा सामना केल्यानंतर अखेर यश मिळाले. त्यामुळे आयुष्यात कष्ट आणि संघर्ष अत्यंत महत्त्वाचा आहे. आज या व्यासपीठावर जी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, ती सर्वजण मोठा संघर्ष करूनच या पदापर्यंत पोहोचली आहेत.
     माझ्या पडत्या काळात ज्या काही मोजक्या लोकांनी मला प्रोत्साहन दिले आणि आधार दिला, त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे सीताराम गावडे. आपल्या समाजातील गुणवंत मुला-मुलींना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, या उदात्त उद्देशाने सकल मराठा समाजाच्या माध्यमातून ते गेली अनेक वर्षे या कौतुक सोहळ्याचे सातत्याने आयोजन करत आहेत. १० वी आणि १२ वी नंतर पुढे नेमकं काय करायचं, याचे योग्य मार्गदर्शन या व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना मिळते, असे ते म्हणाले.

*राणे साहेबांमुळेच जिल्ह्यात उच्च शिक्षणाची गंगा: आ. दीपक केसरकर*
यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी ज्या मेडिकल कॉलेजची स्थापना केली, तिथून पहिली डॉक्टरांची बॅच यशस्वीपणे बाहेर पडली, हा मोठा अभिमान आहे. नारायण राणे यांनी जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण करून स्थानिक मुलांना उच्च शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध करून दिली. आज त्यांचे दोन्ही सुपुत्र (आ. निलेश राणे आणि आ. नितेश राणे) जिल्ह्याच्या विकासासाठी उत्तम काम करत आहेत.” मराठा समाजाने आपल्या राजकीय प्रवासात नेहमीच खंबीर साथ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

*युती सरकारकडून मराठा समाजाला सर्व सवलती: संजू परब*
शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष संजू परब आपल्या मनोगतात म्हणाले की, सह्याद्रीच्या पट्ट्यातील गोरगरीब आणि गुणवंत मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी आ. निलेश राणे आणि आ. दीपक केसरकर हे नेहमीच अशा कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहून प्रोत्साहन देतात. तसेच राज्यातील युती सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सर्व सवलती उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी शासनाचे विशेष आभार मानले.
  
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष जेष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी मराठा समाज संघटनेची वाटचाल विषद केली.
या भव्य सोहळ्याला व्यासपीठावर आ. दीपक केसरकर, युवराज लखमराजे भोंसले, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नगरसेवक संजू परब, वेंगुर्ले सभापती शंकर घारे, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर, शिवसेना तालुका प्रमुख दिनेश गावडे, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, संदीप कुडतरकर, माजी नगरसेवक विलास जाधव, माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत, निरवडेचे माजी सरपंच हरी वारंग यांच्यासह मराठा समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed