
दिनांक: १२/०६/२०२६
न्हावेली: मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या न्हावेली जोड रस्त्याच्या कामात गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, न्हावेली माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य अक्षय पार्सेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे . या निकृष्ट कामाची १५ दिवसांत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र उपोषण छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे . यासंदर्भात कुडाळ येथील कार्यकारी अभियंत्यांकडे थेट लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे .
न्हावेली जोड रस्ता किलोमीटर ०० ते ३.४० या दरम्यान खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम करताना सर्व नियम व निकष धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे . रस्त्याची जाडी आणि गुणवत्ता मानकांनुसार नसल्याने, रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत . तसेच रस्त्यालगतच्या गटारांची दुरवस्था तशीच कायम ठेवण्यात आली आहे . विशेष म्हणजे, या रस्त्याची दुरुस्ती मुदत ३० मे २०२६ रोजी संपली असूनही, वारंवार कळवूनही कंत्राटदाराने कामाची दुरुस्ती केलेली नाही .
या मार्गावर जोड रस्ते आणि लगतच्या घरांमध्ये पाणी जाण्यासाठी जे पाईप टाकण्यात आले आहेत, तिथेही मोठा घोळ झाला आहे . नियोजित डिझाईननुसार या पाईपच्या दोन्ही बाजूंना सिमेंट-दगडांचे मजबूत बांधकाम (पिचिंग) करणे बंधनकारक होते . मात्र, कंत्राटदाराने केवळ पाईप टाकून त्यावर वरवर माती टाकण्याचे अत्यंत थातुरमातूर काम केले आहे . यामुळे पावसाळ्यात हे पाईप वाहून जाण्याची किंवा रस्ता खचण्याची तीव्र भीती निर्माण झाली आहे .
रस्त्याचे काम एवढ्या निकृष्ट दर्जाचे झाले असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामाची प्रत्यक्ष जमिनीवर पाहणी का केली नाही, असा संतप्त सवाल माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य आणि ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे . प्रत्यक्ष पडताळणी न करताच कंत्राटदाराची देयके (बिल्स) घाईघाईने कशी पास करण्यात आली, यात संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कंत्राटदाराशी थेट आर्थिक साठलोट असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे .
कंत्राटदाराला दिलेल्या वर्क ऑर्डर आणि डिझाईननुसारच काम पूर्ण झाले आहे का, याची तपासणी करण्यासाठी या रस्त्याची ‘उच्चस्तरीय तांत्रिक चाचणी’ (Quality Test) घेण्यात यावी, अशी मागणी माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य अक्षय पार्सेकर यांनी केली आहे . प्रशासनाने १५ दिवसांत यावर ठोस पावले न उचलल्यास संपूर्ण न्हावेली ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे .
