
दिनांक: १०/०६/२०२६
बांदा: मडुरा रेखवाडी येथे वीज खांबावरील बल्ब बदलताना ११ केव्ही विद्युत प्रवाहाचा धक्का बसून युवक जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी हलगर्जीपणा केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर गंगाराम केरकर (३१, रा. मडुरा-देऊळवाडी) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार कृष्णा लक्ष्मण गावडे (५५, रा. मडुरा) व रघुनाथ ठाकूर (५५, रा. बांदा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर केरकर यांनी इलेक्ट्रिकल कामाचे प्रशिक्षण घेतले असून यापूर्वी ग्रामपंचायतीमार्फत स्ट्रीटलाईटची कामे केली आहेत. ३० एप्रिल रोजी दुपारी मडुरा रेखवाडी येथे देवाच्या कार्यक्रमानिमित्त होणाऱ्या नाटकासाठी सिमेंटच्या खांबावरील बल्ब बदलण्याची आवश्यकता असल्याचे सांगून त्यांना घटनास्थळी बोलावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनास्थळी गेल्यानंतर सुमारे २० फूट उंचीच्या सिमेंटच्या वीज खांबावर चढून बल्ब बदलण्यास सांगण्यात आले. मात्र यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने अथवा संरक्षक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. बल्ब बदलत असताना सागर केरकर यांना अचानक ११ केव्ही विद्युत प्रवाहाचा धक्का बसला आणि ते खांबावरून खाली कोसळले.
या अपघातात त्यांच्या मानेला, कमरेला, डाव्या पायाला तसेच उजव्या हात व पायाला दुखापत झाली. संबंधितांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटना ३० एप्रिल रोजी घडली असून याप्रकरणी ८ जून रोजी रात्री उशिरा बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास बांदा पोलीस हवालदार प्रसादी करीत आहेत.
