
दिनांक: ०७/०६/२०२६
संपादकीय:
१. संतापजनक कारभार: नीट परीक्षेबाबत जो काही संतापजनक कारभार NTA म्हणजे National Testing Agency ने केला त्यामुळे आधीच लाखो विद्यार्थी आणि पालकांना पुन्हा त्याच परीक्षेला सामोरे जाण्याचा भुर्दंड बसला आहे. त्याचबरोबर CBSE म्हणजे Central Board of Secondary Education या संस्थेने मुलांचे पेपर तपासण्याच्या बाबतीत एक अभूतपूर्व गोंधळ घातला आहे. त्याचबरोबर याप्रकरणी CBSE च्या ऑनलाईन यंत्रणेची लक्तरेही काही इथिकल हॅकर लोकांनी वेशीवर टांगली आहेत. हे सगळं बघता एकंदरच केंद्रीय शिक्षण खात्याचा कारभार किती निकृष्ट प्रतीचा आहे हे कोणालाही सहज दिसून येईल…
२. नेते बचाव मोहीम: मात्र हे एवढं सगळं होऊनही, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला नाही. त्यांनाही तो द्यावासा वाटला नाही! याउलट फक्त एका सरकारी अधिकाऱ्याची बदली करून आम्ही कडक कारवाई केली अशी बातमी गोदी मीडियाकडे सुपूर्त केली गेली. याबाबत चरित्रनिर्माण वगैरे बाता मारणाऱ्या मातृसंस्थेलाही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्याची बुद्धी झाली नाही! सगळीकडे राष्ट्रप्रथम-राष्ट्रप्रथम म्हणत लटक्या देशभक्तीचे भपकारे सोडत फिरणाऱ्या मोदीभक्तांनाही याबाबतीत देशहित वगैरेची चिंता दिसत नाही!!
३.सरकारचा वरदहस्त: गेल्या दहा-बारा वर्षांत आपल्या राजकीय व्यवस्थेतून Accountability म्हणजे उत्तरदायित्व ही संकल्पनाच हद्दपार केली गेली आहे. एखाद्या मंत्र्याने वाईट काम केलं किंवा त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले तर त्याचा राजीनामा घेणे ही पद्धतच रद्द ठरवण्यात आली आहे. मंत्र्यांचे घोटाळे, वाईट कारभार आणि निकृष्ट कामकाज हे याआधीही होत असत. पण सध्या मोदीकाळात जसा घाऊक राजाश्रय या प्रकारांना लाभला आहे तसा पूर्वी क्वचितच दिसत असेल.
४. भ्रष्ट कारभार: यामागे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे गेल्या दहा-बारा वर्षांत भ्रष्ट आणि निकृष्ट अशा दोन्ही स्वरूपाच्या कारभारासाठी लागू झालेली एक सुलभ परवानगी योजना होय! या परमिशन स्ट्रक्चरबद्दल याआधीही सविस्तर लिहून झालं आहे. तुम्ही मोदींच्या एखाद्या मंत्र्याला जाब विचारला तर भाजपची आयटी सेल आणि मोदींचे भक्त आधी तुम्हाला डीप स्टेट – सोरोस एजंट – अर्बन नक्षल – देशद्रोही वगैरे म्हणतात, नंतर सांगतात की तुम्हाला देशभक्त भ्रष्टाचारी हवा की देशद्रोही भ्रष्टाचारी हवा ते सांगा, आमचा माणूस कसाही असला तरी देशभक्त तर आहेच ना!!
५.बेजबाबदार यंत्रणा: भाजपची दमदार पगारी आयटी सेल आणि एका नेत्याच्या भक्तीत लीन होऊन मेंदूबधीर झालेले बिनपगारी मोदीभक्त यांच्या हातभाराने हे परमिशन स्ट्रक्चर आपल्या देशात वाढले आणि बहरले आहे. या परमिशन स्ट्रक्चरचा थेट परिणाम असा झाला आहे की आता कोणताही मंत्री, नेता आणि सरकारी अधिकारी जबाबदारी घेणे वगैरे भानगडीत पडत नाही. आपण कसेही वागलो तरी आपल्यावर कारण आरोप करणाऱ्याला टार्गेट करून आरोपांचा निकाल लावणारी मजबूत यंत्रणा आपल्या पाठी उभी आहे याची या लोकांना पक्की खात्री झालेली आहे…
६. कायद्याची भीती हरवली: ज्यांच्या खात्याने चालवलेला संतापजनक कारभार सध्या गाजत आहे, ते धर्मेंद्र प्रधानदेखील या परमिशन स्ट्रक्चरचेच लाभार्थी आहेत! त्यांना जराही लाज लज्जा चुकीची जाणीव वगैरे वाटत नसावी, त्यांना आपल्यावर काही कारवाई होईल याची भीतीही दिसत नसावी, नाहीतर एवढ्या लाखो निरपराध मुलांच्या भविष्याशी खेळ करून ते इतके बिनधास्तपणे वावरले नसते. तुम्ही त्यांच्या मीडियाला दिलेल्या प्रतिक्रिया बघा किंवा त्यांची अधिकृत ट्विट बघा. कुठेही आपल्या या कारभाराची जराही लाजशरम त्यांना असल्याचं दिसत नाही…
७. मंत्र्याच्या मुलांचे शिक्षण परदेशात: यानिमित्ताने धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी परदेशात शिकते असा शोध कोणीतरी लावला आहे. आता जगात कोणी कुठे शिकावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे, शिक्षणाला – उद्योगधंद्याला – वैयक्तिक प्रगतीसाठी देशाच्या सीमेची बंधने असू नयेत हेही खरं आहे. मात्र जे सरकार दिवसरात्र लोकांना स्वदेशीचे उपदेश देतं त्याच सरकारच्या मंत्र्यांची मुले परदेशात शिकत असतील तर लोक त्यावर बोट ठेवणारच! तुम्ही लोकांना विश्वगुरूची अफू पाजता, इथल्या शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडवता आणि आपली मुलं परदेशी पाठवता हे कसं आणि किती दिवस चालेल?
८. परदेशी शिक्षणाचा थाट: मोदीजी भारतीय जनतेला परदेशी फिरू नका वगैरे थोर उपदेश करत, स्वदेशीची टेप ऐकवतात आणि देशभक्तीसाठी बलिदान करायची इमोशनल आव्हाने करतात! दुसरीकडे त्यांच्या मंत्र्यांची मुले परदेशात शिकतात. तिथल्या विद्यालयांना फी भरून पोसतात. शिक्षणमंत्री प्रधान यांची मुलगी अमेरिकेत शिकते तर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा मुलगा अमेरिकन नागरिक आहे. व्यापारमंत्री पीयूष गोयल यांची मुलं अमेरिकेत शिकतात तर सुरक्षामंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा युरोपमध्ये शिकतो असं वार्तांकन उपलब्ध आहे. आता या इंटरनेटवर दिसणाऱ्या यादीचा तपशील अजून वाढवता किंवा सुधारता किंवा पडताळता येईल, मात्र इथे सांगायचा मुद्दा असा की गेली बारा वर्षं सत्तेत असलेल्या सरकारमधील बहुतांश मंत्र्यांची मुलं परदेशात शिकत असतील तर नक्की कोणत्या तोंडाने तुम्ही देशातील जनतेला स्वदेशीचे धडे देता? इथल्या शिक्षण व्यवस्थेचा तुम्ही जो बट्ट्याबोळ करत आहात तो बघितल्यावर भारतातील जनता तुमच्या मुलांचं परदेशी शिक्षण बघून त्यावर प्रश्न उपस्थित करणारच!
९. शिक्षण व्यवस्था ढासळती: जगातल्या सर्वश्रेष्ठ युनिव्हर्सिटी अशी एक यादी QS World University Ranking म्हणून प्रसिद्ध केली जाते. यामध्ये सध्या भारतातील एकही युनिव्हर्सिटी पहिल्या शंभरमध्ये नाही. गेली बारा वर्ष डबल इंजिन ट्रिपल इंजिन घेऊन सत्तेत असलेल्या लोकांना याची काही जाणीव आहे की नाही? भारताची शिक्षणव्यवस्था सुधारायची सोडून परीक्षा पे चर्चा वगैरे बाष्कळ गोष्टी करण्यात या सरकारला जास्त रस दिसतो. अर्थात जे सरकार नीट आणि सीबीएससीसारख्या साध्या परीक्षाही नीट घेऊ शकत नाही, त्यांच्याकडून अशा जागतिक स्तराच्या युनिव्हसिर्टी तयार करण्याची अपेक्षा करणं ही बाकी आपलीच चूक म्हणायला पाहिजे!
१०.लोकशाहीचे भविष्यातील लचके: इतक्या चुका करून, लाखो विद्यार्थी आणि पालकांना भुर्दंड सहन करावा झाल्यानंतर, इतके गंभीर आरोप होऊनही, विद्यार्थी संघटनांची इतकी आंदोलने होऊनही, सोशल मीडियावर लोकांनी इतका संताप व्यक्त करूनही धर्मेंद्र प्रधान अजूनही मंत्री कसे आहेत? त्याचा राजीनामा घ्यावा असं मोदींना वाटत नाही का? किमान जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी म्हणून आपणच राजीनामा द्यावा असं धर्मेंद्र प्रधान यांनाही वाटत नसेल काय? इतक्या लाखो मुलांचं भविष्य टांगणीला लावून त्यांना रोज शांत झोप लागत असेल काय? आणि ही अशी गेंड्याची कातडी असलेले शिक्षणमंत्री भारताला लाभले हे देश म्हणून आमचं भाग्य म्हणावं की पूर्वसुकृत?
– मकरंद देसाई
#NEET #CBSE #DharmendraPradhan
