
दिनांक: ०७/०६/२०२६
न्हावेली प्रतिनिधी: गोवा येथे पर्यटनाचा आनंद घेऊन परतणाऱ्या रत्नागिरीतील पर्यटकांच्या कारला न्हावेली येथे गव्याने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात पर्यटकांच्या कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कारचालक आणि गाडीतील अन्य कुटुंबीय या अपघातातून सुखरूप बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथील एक कुटुंब कारने गोव्यात पर्यटनासाठी गेले होते. गोव्याहून परतत असताना न्हावेली परिसरात अचानक एक गवा धावत रस्त्यावर आला आणि त्याने पर्यटकांच्या चालत्या गाडीला थेट जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की गाडीच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गाडीतील पर्यटक कुटुंब प्रचंड घाबरले होते, मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
या अपघात घडला त्याच वेळी तिथून शिरोड्याच्या दिशेने जाणारे कारचालक सुधाकर रेडकर यांनी तत्परता दाखवत या घटनेची माहिती तातडीने वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, या परिसरात वन्यजीवांचा वावर लक्षात घेता वाहनचालकांनी गाड्या जपून चालवाव्यात, असे आवाहन केले जात आहे.
