आताच शेअर करा

दिनांक: ०३/०६/२०२६

न्हावेली : सावंतवाडी-मळेवाड मार्गांवरील न्हावेली चौकेकरवाडी येथे मुख्य रस्त्याची साईडपट्टी कोसळून तब्बल २ वर्षे झाली, तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी केवळ पाण्याचे पत्रा बॅरल उभे करून ठेवण्यात आले असून, प्रशासनाचा हा निष्काळजीपणा वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. आगामी पावसाळ्यात योग्य उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा न्हावेली गावाचे विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी दिला आहे.

या गंभीर समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, तक्रार केल्यानंतर केवळ अधिकारी येतात, जागेची पाहणी करून जातात आणि त्यानंतर पुन्हा या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या समस्येचे आणि वाहनधारकांच्या जीवाचे काहीही गांभीर्य नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

ज्या ठिकाणी रस्त्याची साईडपट्टी कोसळली आहे, तिथे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असतो. मुसळधार पाऊस पडल्यास पाणी थेट रस्त्यावरून वाहते. अशा वेळी कोसळलेला भाग आणि बाजूचा मोठा खड्डा वाहनधारकांच्या निदर्शनास येत नाही. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या दुर्घटनेवर बांधकाम विभागाने कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे होते. मात्र, तिथे फक्त तात्पुरते पत्रा बॅरल उभे करून ठेवण्यात आले आहेत.

या मार्गावरून रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात वाहन चालवताना रस्त्याचा अंदाज न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. “जर येथे एखादा मोठा अपघात झाला किंवा कोणाचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे. बांधकाम विभागाच्या या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

या गंभीर समस्येवर न्हावेली गावाचे विद्यमान सदस्य अक्षय पार्सेकर यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. येत्या चार दिवसांत बांधकाम विभागाने या ठिकाणी योग्य आणि ठोस उपाययोजना केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे पार्सेकर यांनी म्हटले आहे. आता या इशाऱ्यानंतर तरी सुस्त बांधकाम विभागाला जाग येणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *