दिनांक: ०३/०६/२०२६

सावंतवाडी: देशातील शिक्षण व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या परीक्षा जेव्हा निष्पक्षपातीपणे पार पडत नाहीत, तेव्हा संपूर्ण समाजाचा पायाच डळमळीत होतो. आज नीट (NEET) परीक्षेच्या निमित्ताने जे काही घडत आहे, ते केवळ एका परीक्षेचे अपयश नसून, ती संपूर्ण शिक्षण यंत्रणेच्या ढिसाळपणाची आणि नैतिक अध:पतनाची लक्तरे आहेत. पेपर फुटण्याची ही पहिलीच वेळ नाही; अनेकदा परीक्षेच्या आधीच प्रश्नपत्रिका फोडून मुलांच्या भविष्याशी खेळ खेळला जातो.
लाखो विद्यार्थी आपल्या आयुष्यातील दोन वर्षे एका खोलीत बंदिस्त होऊन घालवतात. त्यांची रात्र-दिवस एक करण्याची जिद्द आणि डोळ्यांतील स्वप्नांसाठी केलेली धडपड शब्दांत मांडणे अशक्य आहे. या काळात ते स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार न करता केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात. दुसरीकडे, मध्यमवर्गीय पालक आपल्या हक्काचे पैसे, प्रसंगी औषधोपचारांचे पैसे वाचवून किंवा शेत गहाण ठेवून आपल्या मुलांच्या फीचा भरणा करतात. जेव्हा या कष्टाला योग्य फळ मिळत नाही, तेव्हा विद्यार्थी आणि पालकांचे जे नुकसान होते, ते भरून काढणे अशक्य असते. परीक्षेच्या आधीच प्रश्नपत्रिका फुटणे आणि ती दलालांच्या हातात मिळणे, ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. ही साखळी इतकी खोलवर रुजलेली आहे की, प्रामाणिकपणे अभ्यास करणारा विद्यार्थी या स्पर्धेत मागे पडतो आणि ज्याने रातोरात पेपर विकत घेतला, तो उच्च पदावर अधिकारी बनतो. हे सत्य पचवणे कठीण आहे. अशा प्रकारे अधिकारी बनणे खरोखरच निंदनीय आहे. सर्व सोपस्कार ‘हायटेक’ यंत्रणेच्या नावाखाली केले जातात. परंतु, ज्यांनी कोट्यवधी रुपयांची बोली लावून पेपर विकत घेतले आहेत, अशा दलालांना पकडण्यात हीच यंत्रणा सपशेल अपयशी ठरते. वारंवार घडणाऱ्या या घटना पाहून प्रश्न पडतो की, ही यंत्रणा प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या विरोधात काम करते की गुन्हेगारांच्या संरक्षणासाठी?
जेव्हा मध्यमवर्गीय घरातील तरुणाचे स्वप्न डोळ्यांदेखत चिरडले जाते, तेव्हा केवळ तो तरुणच संपत नाही, तर त्याच्या पूर्ण कुटुंबाचा आधार कोसळतो. हे नैराश्य विद्यार्थ्याला कोणत्या टोकाच्या निर्णयापर्यंत घेऊन जाईल, याचा विचारही या यंत्रणेला करावासा वाटत नाही. कागदी परिपत्रके काढणे, पोकळ आश्वासने देणे आणि नवीन नियमावली जाहीर करणे हा केवळ वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे. आता वेळ आली आहे ती या भ्रष्ट व्यवस्थेला जाब विचारण्याची. केवळ ‘तपास सुरू आहे’ असे म्हणण्यापेक्षा दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे सर्व घडले, त्यांना जबाबदार धरले पाहिजे. ज्या कोचिंग माफियांच्या जोरावर ही साखळी चालते, त्यांचे जाळे उद्ध्वस्त केले पाहिजे. जर हे थांबले नाही, तर उद्याच्या पिढीचा या शिक्षण व्यवस्थेवरून पूर्णपणे विश्वास उडेल. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, हे ब्रीदवाक्य आपण अनेकदा ऐकतो. पण जर त्या भविष्यालाच सुरक्षित ठेवण्याची धमक या व्यवस्थेत नसेल, तर आपण कोणत्या विकासाच्या गोष्टी करतो आहोत? आता वेळ आली आहे ती प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आणि या व्यवस्थेतील काळेबेरे उघडकीस आणण्याची. पुढील काळात कोणत्याही विद्यार्थ्यावर अशी वेळ येऊ नये, यासाठी तातडीने आणि ठोस पावले उचलणे ही काळाची गरज आहे. ही केवळ नीट परीक्षेची समस्या नाही, तर ती संपूर्ण शिक्षण पद्धतीला लागलेल्या कीडीची समस्या आहे. जर आपल्याला खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि गुणवान शासन-प्रशासन हवे असेल, तर ही परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि कोणाच्याही दबावापासून मुक्त असणे अनिवार्य आहे.जे विद्यार्थी आज या व्यवस्थेच्या विरोधात रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करत आहेत, त्यांच्या संघर्षाला सलाम. न्याय मिळणे हा त्यांचा अधिकार आहे आणि तो मिळवून देण्याची जबाबदारी या व्यवस्थेची आहे. ही वेळ आता लांबणीवर टाकून चालणार नाही, कारण आता संयमाची भाषा संपली आहे. ज्या माफियांच्या मुजोरीवर ही परीक्षा पद्धती चालते, त्यांना भर चौकात आणून त्यांची लायकी दाखवण्याची वेळ आली आहे. केवळ कागदी नियम आणि पोकळ भाषणे देऊन तुम्ही या पिढीचा राग शांत करू शकणार नाही. ज्या दिवशी या विद्यार्थ्यांचा संयम सुटेल आणि ते रस्त्यावर उतरतील, त्या दिवशी तुमच्या या भ्रष्ट खुर्च्यांनाही हादरे बसतील. तो दिवस दूर नाही; या ज्वालामुखीचा एक दिवस उद्रेक होईल. त्यातूनच नवे क्रांतीवीर तयार होतील आणि जेव्हा असे होईल, तेव्हा हिशोब घेतल्याशिवाय ते थांबणार नाहीत. प्रत्येक अन्यायाचा बदला घेतला जाईल आणि या व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जातील.
विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहणे बंद करा. जर तुम्ही आज आमच्या भविष्याशी खेळत असाल, तर उद्या आम्ही तुमच्या या सडलेल्या व्यवस्थेचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. आता सुधारणा नको, तर क्रांती हवी आहे! क्रांती!
भारत माता की जय!!! वंदे मातरम्!!!
॥ भ्रष्टव्यवस्था ॥
काळाच्या ओघात, स्वप्ने झाली गहाण,
दलालांच्या हाती, व्यवस्था ही बेईमान.
खोलीत बंदिस्त, जीव होतो अस्वस्थ,
पालकांचे कष्ट, दुःखात होते व्यस्त.
यंत्रणा आंधळी, गुन्हेगार सुटले,
प्रामाणिक कष्टाचे, स्वप्न सारे तुटले.
कोचिंग माफिया, हा खेळ मांडत राहे,
भविष्य तरुणांचे, पूर्णपणे नष्ट होत आहे.
शिक्षण हे आता, बाजारी वस्तू झाली,
सामर्थ्य गुणांचे, ती मातीत मिसळली.
कागदी आदेश, हे नुसतेच बोल बोले,
सत्याचे मार्ग आता, सारे वाकडे झाले.
नैराश्य मुलांच्या, नशिबी हे आले,
पापाचे हे ओझे, कधी तरी थांबावे.
जाब विचारावा, आता भ्रष्ट यंत्रणेला,
धडा शिकवावा, माफिया-दलालाला.
देशाचे भवितव्य, धोक्यात हे आले,
आता तरी व्हा जागे, सर्वांचे होऊ दे भले.
न्याय मिळो सर्व, या कष्टाळू हाताला,
हद्दपार करावे त्या, अन्यायी भ्रष्ट व्यवस्थेला
शब्दांकन : छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार सन्मानित
साहित्यिक : संतोष चिले
