
दिनांक: २३/०४/२०२६
सावंतवाडी: सावंतवाडी शहरात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून एप्रिल महिन्यात कधीही न जाणवलेला पाण्याचा वणवा यंदा खोदाईच्या नियोजित कामांमुळे सोसावा लागत आहे. गॅस पाईपलाईन आणि नळ पाणी योजनेसाठी शहरात करण्यात आलेल्या खोदाईमुळे पाईपलाईन्स फुटल्या असून, या विस्कळीत परिस्थितीला नगराध्यक्ष आणि प्रशासन सर्वस्वी जबाबदार असल्याचा घणाघात शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला.
येत्या चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महिला रिकाम्या घागरी घेऊन नगरपालिकेवर धडकतील आणि भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढला जाईल, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
संजू परब यांनी यावेळी प्रशासकीय कारभारावर तीव्र ताशेरे ओढले. शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्या आहेत, मात्र प्रशासनाने त्या दुरुस्त करण्याऐवजी त्यावर केवळ माती ओतण्याचे काम केले आहे. यामुळे पाणी थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याऐवजी जमिनीत जिरत आहे. पावसाळ्यातही ही समस्या कायम राहण्याची भीती असून, प्रशासनावर नगराध्यक्षांचा कोणताही अंकुश नसल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरातील अनेक भागांतून पाणी येत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत असून प्रशासनाकडून केवळ वेळेत बदल करून वेळ मारून नेली जात आहे. मात्र जोपर्यंत फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत केवळ वेळ बदलून हा प्रश्न सुटणार नाही, असेही परब यांनी स्पष्ट केले. जनतेने नगराध्यक्षांना विश्वासाने निवडून दिले आहे, त्यामुळे ही परिस्थिती सुधारणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.
या गंभीर समस्येची दखल घेण्यासाठी प्रशासनाला चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जर या कालावधीत योग्य नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर सर्व सावंतवाडीकर एकत्र येऊन नगरपालिकेच्या विरोधात एल्गार पुकारतील. या मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग असेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही संजू परब यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, नगरसेविका ॲड. नीता कविटकर, स्नेहा नाईक, दिव्या सूर्याजी, शर्वरी धडगावकर, क्लेटस्ट फर्नांडिस आधी पदाधिकारी उपस्थित होते
