आताच शेअर करा

दिनांक: १९/०४/२०२६

संपादकीय: मेहनत, जिद्द आणि चिकाटी या गुणांच्या जोरावर एखादी व्यक्ती शून्यातून विश्व कसं निर्माण करू शकते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे पत्रकार यश माधव. ‘कोकण व्हिजन न्यूज’चे संपादक यश माधव यांच्या कार्याची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून, देशातील प्रतिष्ठित ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
यश माधव यांचा प्रवास अत्यंत खडतर राहिला आहे. एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या यश यांनी गरिबीचे चटके सहन केले. उशाशी गरिबी असतानाही त्यांनी हार न मानता आपला चरितार्थ चालवला. परिस्थिती बेताची असली तरी समाजाप्रती असलेली जाणीव त्यांनी कधीही कमी होऊ दिली नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी दिलेली ही झुंज आज त्यांना एका उंचीवर घेऊन गेली आहे.
मुंबईसारख्या मायानगरीत २५ वर्षे राहूनही त्यांचे पाय मातीशी जोडलेले राहिले. मुंबईत असताना त्यांनी एका विख्यात संघटनेचे नेतृत्व करत उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष म्हणून आपला ठसा उमटवला होता. मात्र, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधवांसाठी काहीतरी करावे, या ओढीने त्यांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या काळात आलेल्या संकटावर मात करत त्यांनी गावी स्थायिक होऊन समाजसेवेचा वसा घेतला.
समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असल्याने त्यांनी सुरुवातीला दोन वर्षे राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे अनुभवास आलेल्या ‘पाय खेचण्याच्या’ प्रवृत्तीमुळे त्यांनी आपला मार्ग बदलला. कुणाचेही ताशेरे न ओढता आणि कोणाच्याही दबावाखाली न राहता जनसेवा करता यावी, यासाठी त्यांनी पत्रकारितेचे क्षेत्र निवडले.
गेल्या सहा वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गावांचे प्रश्न मांडले आणि कित्येक गोरगरीबांना न्याय मिळवून दिला. ‘कोकण व्हिजन न्यूज’च्या माध्यमातून त्यांनी मांडलेले रोखठोक विचार आणि जनतेच्या समस्यांचे फलित म्हणजे आज त्यांना ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ सारख्या मोठ्या संघटनेवर काम करण्याची संधी मिळाली आहे.
यश माधव यांची ही निवड केवळ एका पदाची प्राप्ती नसून, त्यांच्या प्रामाणिक कष्टाचा आणि समाजसेवेचा सन्मान आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

शब्दांकन
राष्ट्रीय कवी – संतोष चिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed