आताच शेअर करा

दिनांक: १०/०४/२०२६

संपादकीय: लेख.

विज्ञानाच्या युगातलं एक भयाण वास्तव
आज आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. जग प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे. एका बाजूला आपण मंगळावर वस्त्या करण्याची स्वप्ने पाहत आहोत, तर दुसऱ्या बाजूला आजही समाजात “अंधश्रद्धेचा अक्राळविक्राळ अंधार” पसरलेला दिसतो. ही केवळ शोकांतिका नाही, तर आपल्या वैचारिक प्रगतीला लागलेली एक मोठी कीड आहे.
श्रद्धेचा बाजार आणि सामान्यांची लूट
श्रद्धा ही माणसाला जगण्याचं बळ देते, पण जेव्हा त्या श्रद्धेचा डोळसपणा हरवतो, तेव्हा तिचे रूपांतर अंधश्रद्धेत होते. समाजात वावरणारे भोंदू बाबा, तांत्रिक,मांत्रिक आणि ढोंगी साधू लोकांच्या भीतीचा आणि अगतिकतेचा फायदा घेतात.
अघोरी पूजा, किंवा चमत्कार करण्याच्या नावाखाली सामान्यांची कष्टाची कमाई लुटली जाते.
आजारपणात डॉक्टरांकडे जाण्याऐवजी अंगारा-धुपारे किंवा करणी-बाधेच्या नावाखाली उपचार केले जातात.
यात वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागतात.
माणसाची विचार करण्याची शक्ती गोठवून त्याला भीतीखाली ठेवणे, हे अंधश्रद्धेचे सर्वात मोठे यश आहे.
अंधश्रद्धेचे हे जाळे तोडण्यासाठी केवळ कायदे असून चालत नाही, तर सामाजिक प्रबोधन अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर या अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. त्यांचा हा वारसा पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे.
प्रत्येक गोष्टीमागे ‘कार्यकारणभाव’ शोधण्याची वृत्ती अंगी बाणवा.
केवळ पदवी घेणं म्हणजे शिक्षण नव्हे, तर सत्याची आणि असत्याची पारख करण्याची क्षमता म्हणजे शिक्षण.
चमत्कारांच्या मागे न धावता स्वतःच्या कष्टावर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवा.

                   कविता
          II अंधार अंधश्रद्धेचा II
अंधश्रद्धेचा हा पसरला मोठा बाजार आज चोहीकडे,
भोंदूगिरीच्या जाळ्यात या सामान्य जन झाले वेडे.
बुवाबाजीची ही जुनाट लाट गल्लोगल्ली फोफावते,
श्रद्धाळू लोकांच्या विश्वासाची अशी क्रूर चेष्टा मांडते.

राजकीय वरदहस्त मिळताच बाबांचा बडेजाव वाढतो,
खोट्या चमत्कारांच्या जोरावर तो दीन-दुबळ्यांना नाडतो.
लिंबू, नारळ, काळ्या बाहुलीचा अघोरी खेळ मांडला,
अंधश्रद्धेच्या विळख्यात सत्याचा श्वास यांनी कोंडला.

विज्ञानाच्या युगातही लोक तंत्र-मंत्रांच्या पाठी धावतात,
ज्ञानाची साथ सोडून भोंदूच्या पायावरती लोळण घालतात.
श्रद्धेच्या नावाखाली हा चालला अधर्मी प्रकार,
माणुसकी संपली, जिथे भरतो चोरांचा दरबार.

करोडोंची ही माया जमा होते बाबांच्या आश्रमात,
गुन्हेगारीचे काळे साम्राज्य वाढते आहे थाटामाटात.
स्त्रीशक्तीचा सन्मान सोडून चालतो येथे छळ,
वासनेची शिकार होऊन अबलेने घेतला गळ.

जागे व्हा, सावध व्हा, रोखा भोंदूगिरीचा हा महापूर,
अंधश्रद्धेच्या या काळोखाला करा आयुष्यातून कोसो दूर.
सत्याची कास धरून विज्ञानाचा प्रकाश मनी रुजवावा,
माणुसकी अन् सद्सद्विवेकबुद्धीचा नवा मार्ग शोधावा.

समाजाच्या प्रगतीसाठी धैर्याने प्रत्येकाने पुढे येत जावे,
अंधश्रद्धेच्या या भस्मासुर मस्तकाला कायमचे ठेचून काढावे.

शब्दांकन: राष्ट्रीय कवी- संतोष चिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *