
दिनांक: १६ ऑक्टोबर २०२५
बांदा प्रतिनिधी:अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा पाडलोस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. 1 चे मुख्याध्यापक विजय गावडे यांची एस. आर. फाउंडेशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध स्तरांवरून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
मुख्याध्यापक विजय गावडे हे शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची चळवळ उभी केली आहे. त्यांच्या पुढाकाराने शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी कार्य करून अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे.
त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यामध्ये गुरुसेवा सन्मान पुरस्कार, युवा संदेश प्रतिष्ठान जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, चौकूळ ग्रामपंचायत आदर्श शिक्षक पुरस्कार, दीपक केसरकर मित्र मंडळ गुरुसेवा सन्मान पुरस्कार, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार आणि स्वर्गीय श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले प्रतिष्ठान उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार यांचा समावेश आहे.
*शिक्षणाचा दर्जा उंचावला*
विजय गावडे यांच्या कार्यामुळे पाडलोस गावातील शाळा नं.1 चा शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारली असून मुलांना विविध शालेय, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. पाडलोस गावाला विजय गावडे यांसारखे आदर्श शिक्षक लाभले हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या व सहकारी शिक्षकांच्या नेतृत्वामुळे शाळेचा सर्वांगीण विकास होत आहे, असे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजल गावडे यांनी सांगितले.
——–
