
दिनांक: १६ ऑक्टोबर २०२५
सावंतवाडी: पूर्वाश्रमीच्या इन्सुली येथील आणि सध्या चराठा येथील सौ शमिका समीर नाईक यांच्या “सुरभी” या पाहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. माजगाव पंचक्रोशी मन विकास ग्रंथालय मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्याचे औचित्य साधून हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला.
यावेळी सावंतवाडीच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी सभापती अशोक दळवी, माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष राज्य ग्रंथ मित्र पुरस्कारप्राप्त अनंत उर्फ आनंद वैद्य, ज्येष्ठ लेखक तथा साहित्यिक प्रवीण बांदेकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, माजगांव सरपंच रिचर्ड डिमेलो, अँड शामराव सावंत, अँड सचिन गावडे, आर के सावंत, माजगांव पंचक्रोशी मनविकास ग्रंथालय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, कार्यवाह सतिश मालसे, ग्रंथपाल सौ. मधू कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी शमिका नाईक यांचे लेखन अविरत चालू राहो यासाठी सदिच्छा देत त्यांच्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पूर्वाश्रमीच्या लालन शंकर केरकर यांना इन्सुली नूतन माध्यमिक विद्यालयात इयत्ता ७ वी पासून लेखनाची सवय जडली. यासाठी त्या शाळेतील सर्व माजी शिक्षकांबद्दल ऋण व्यक्त करतात. त्या आभार मानतात. साहीत्य क्षेत्रातील त्यांच्या लेखनाची दखल घेऊन त्यांना पत्र भूषण पुरस्कार तसेच अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
सौ. शमिका समीर नाईक यांचा “सुरभी” हा पहिला काव्यसंग्रह आहे. हा काव्यसंग्रह त्यांनी आपल्या आई – वडिलांना समर्पित केला. या काव्यसंग्रहामध्ये अनेक सामाजिक, कौटुंबिक तसेच नैसर्गिक जीवनावर त्यानी कविता साकारलेल्या आहेत. या काव्यसंग्रहातील कवितांमध्ये अतिशय सोज्वळता, भावूकता जाणवते. यापूर्वी त्यानी दैनिक तरूण भारतच्या पडसाद सदरामध्ये लेखन केले आहे.