
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
बांदा: भाजप सोशल मीडिया, सिंधुदुर्ग कार्यकारिणीत बांदा मंडळाच्या सोशल मीडिया संयोजकपदी विराज विष्णू परब यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा सोशल मीडिया संयोजक श्रीकृष्णा अभिनाथ परब यांच्या स्वाक्षरीने शनिवार, दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही निवड अधिकृत जाहीर करण्यात आली.
पक्षाच्या सोशल मीडिया कार्यकारिणीत नव्या दमदार नेतृत्वाला संधी देण्याच्या हेतूने ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विराज परब हे गेल्या काही काळापासून पक्षाच्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका व कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे सातत्याने काम करत आहेत. बांदा मराठा समाजाचे ते अध्यक्ष असून त्यांनी आतापर्यंत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.
बांदा मंडळात सोशल मीडिया संयोजक म्हणून त्यांची नेमणूक झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नियुक्तीमुळे बांदा परिसरातील युवकांना पक्षाच्या सोशल मीडिया उपक्रमांमध्ये अधिक प्रमाणात सहभागाची संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या नियुक्तीचे पत्र जाहीर करताना जिल्हा संयोजक श्रीकृष्णा अभिनाथ परब यांनी विराज परब यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत, त्यांच्या कार्यकाळात सोशल मीडिया विभाग अधिक सक्षम व प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला.