आताच शेअर करा

दिनांक: ३ ऑक्टोबर २०२५

सावंतवाडी: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, चराठे न. १ येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे अत्यंत उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात शाळेच्या प्रगतीसाठी एकोप्याने काम करण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी केला.
कार्यक्रमाची भावपूर्ण सुरुवात
कार्यक्रमाची विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यानंतर मेळाव्याचे अध्यक्ष मा. श्री. दिगंबर पावसकर यांच्यासह सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
मुलांनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने उपस्थितांचे मन जिंकले. त्यानंतर मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुलींनी गायलेले “ही आवडते मज मनापासुनी शाळा” हे हृदयस्पर्शी गीत ऐकून सर्वजण भारावले .
आठवणींना दिला उजाळा
माजी विद्यार्थी मेळाव्याचे उद्देश सांगताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. पेडणेकर मॅडम यांनी शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट केले. श्री. रघुनाथ वाळके यांनी प्रास्ताविक केले.
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. श्री. चंद्रकांत वेजरे, काका परब, पुरुषोत्तम परब, गोविंद परब, दर्शन धुरी, विश्राम कांबळी, श्रावणी कोठावळे यांनी शाळेच्या जुन्या दिवसांतील गंमती-जंमती आणि शिक्षणाचे महत्त्व सांगितले.
शाळेच्या प्रगतीचा संकल्प
या मेळाव्यात शाळेच्या गरजा, सुविधा आणि प्रगती यावर सखोल चर्चा झाली. माजी अध्यक्ष श्री. समीर नाईक आणि श्री. रघुनाथ वाळके यांनी शाळेपुढील समस्या प्रभावीपणे मांडल्या. शाळेचे वर्तमान अध्यक्ष श्री. उमेश परब यांनी माजी विद्यार्थ्यांनी एकोप्याने शाळेच्या विकासात हातभार लावावा, असे कळकळीचे आवाहन केले. माजी मुख्याध्यापिका श्रीमती. वर्षा देसाई यांनी शाळेच्या आजवरच्या यशोगथा आणि महत्त्वाच्या टप्प्यांचे सादरीकरण केले.
कृषी अधिकारी, पंचायत समिती मान, श्री. प्रशांत चव्हाण यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याचा उद्देश आणि कार्यपद्धती यावर विवेचन करून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
सहकार्यातून झाली भोजन व्यवस्था
याप्रसंगी आयोजित भोजन व्यवस्था सर्वांसाठी खास आकर्षण ठरली. तंटामुक्ती अध्यक्ष श्री. सुनील परब, ओंकार पावसकर आणि नीलेश नाईक यांनी भोजनाची उत्तम व्यवस्था सांभाळली. ग्रामस्थ श्री. रुपेश नाटेकर यांनी अडीच किलो बुंदी तर श्री. रघुनाथ वाळके यांनी पंचखाद्य दिले. कार्यक्रमाच्या पत्रिकांचा खर्च अध्यक्ष श्री. उमेश परब यांनी केला, तर ग्रामपंचायतीने खुर्च्या उपलब्ध करून दिल्या.श्रीम.धनदा शिंदे मॅडम यांनी आकर्षक रांगोळी, फलकलेखन व सजावट केली.  शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.जयश्री पेडणेकर मॅडम श्रीम.आदिती चव्हाण मॅडम,श्रीम.कुंभार ,श्रीम.धनदा शिंदे मॅडम तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक, ग्रामस्थ व सर्व पालकांनी या कार्यक्रमासाठी शनिवार व  रविवार आपला बहुमूल्य वेळ देऊन खूप मेहनत घेतली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती. आदिती चव्हाण यांनी केले.
दुपार नंतर  विद्यार्थ्यांची भजन महिलांच्या फुगडी ,गरबा व  रात्री ग्रामस्थांची भजने  असे भरगच्च कार्यक्रम झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, माता पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनी अथक मेहनत घेतली. शाळेच्या प्रगतीसाठी सर्व घटक एकत्र आल्याने हा मेळावा एक अतिशय यशस्वी आणि प्रेरणादायी सोहळा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *