
मडुरे येथे अतिक्रमित जागा पाहणी दरम्यान वरिष्ठ क्षेत्रीय अभियंता रवींद्र पाटील यांना जाब विचारताना शेतकरी प्रकाश वालावलकर, सुरेश गावडे. सोबत सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे अधिकारी.
दिनांक: १० सप्टेंबर २०२५
बांदा प्रतिनिधी:
मडुरे रेल्वे स्थानकासाठी संपादित केलेल्या जमिनी पलीकडेच्या जात कोकण रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीवर अतिक्रमण केल्याचे भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीत सिद्ध झाले आहे. सदर अतिक्रमण हटवण्यात कोरे प्रशासन टाळाटाळ करत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. कोकण रेल्वेच्या वरिष्ठ क्षेत्रीय अभियंता रवींद्र पाटील यांना संतप्त शेतकऱ्यांनी जाब विचारला असता सुरुवातीला आडमुठी भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रे पाहून नंतर मात्र नरमावले. सामंजस्यातून तोडगा काढण्याचे मान्य केले.
मडुरे रेल्वे स्थानकासाठी सन १९९१ मध्ये शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, कोकण रेल्वेने मूळ हद्दीच्या बाहेर जाऊन शेतकरी प्रकाश वालावलकर यांच्या मालकी हक्काच्या जमिनीवर अतिक्रमण करून रस्ता तयार केला. याबाबत त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, त्याची दखल कोरे प्रशासनाने घेतली नाही. अखेर त्यांनी भूमी अभिलेख विभागाकडे रीतसर अर्ज करून मोजणीची करण्याची मागणी केली.
भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी या जागेची मोजणी केली असता शेतकऱ्याचा आरोप खरा असल्याचे उघडकीस आले. कोकण रेल्वेने हद्दीबाहेर सुमारे ३९ गुंठे जमिनीवर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले. अतिक्रमित जमिनीतील रस्ता काढून जमीन शेतकरी वालावलकर यांच्या ताब्यात देण्यात कोरे प्रशासन टाळाटाळ करीत आहे.
त्यामुळे शेतकरी प्रकाश वालावलकर यांनी १५ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ क्षेत्रीय अभियंता रवींद्र पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांना स्थानिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. त्यांनी आडमुठेपणा दाखवत चुकीचे खापर महसूल, भूमी अभिलेख विभागावर फोडले. मात्र, कोरेची चूक लक्षात येताच त्यांनी सामंजस्याने तोडगा काढण्याचे मान्य केले.
त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. अतिक्रमण काढून वापरलेल्या जमिनीचा मोबदला कोरेने तत्काळ द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. येत्या काही दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, प्रकाश वालावलकर यांनी यावेळी दिला.