
दिनांक: १५ जुलै २०२५
सावंतवाडी :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांचे आज निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते. दोन तासापूर्वी ते माजगाव येथील निवासस्थानी मृच्छीतावस्थेत आढळून आले. त्यांना अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत डॉ.अभिजीत चितारी यांनी दुजोरा दिला आहे.
काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ते परिचित होते. त्यांनी जिल्हा बँक संचालक, शिखर बँक संचालक, पतपेढी तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशी अनेक पदे भूषवली होती. सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल, शांती निकेतन सारख्या अनेक शैक्षणिक संस्थांवर ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.त्यांनी आपल्या काळात काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रयत्न केले. जीवनाच्या अखेरपर्यंत ते काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून राहिले. माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांचे ते चिरंजीव होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांच्या मोठा हातखंडा होता. आपल्या काळात त्यांनी सावंतवाडी मतदारसंघातील व जिल्ह्यातील अनेक प्रश्न हाताळले होते.
कधीही कोणाशी वैरत्व पत्करले नाही. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटत. त्यांनी आपल्या काळात अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते घडवले. विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. अनेकांना मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख होती. त्यांच्या मृत्यूमुळे राजकीय शैक्षणिक क्षेत्राचे, काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. त्या अवस्थेतही त्यांनी आपले राजकीय आणि सामाजिक काम सुरू ठेवले होते. नुकताच त्यांचा ६२ वा वाढदिवस त्यांच्या मित्र परिवाराकडून धुमधडाक्यात साजरा करण्यात आला होता.