आताच शेअर करा

दिनांक: २ जुलै २०२५

सावंतवाडी : डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी ही संस्था सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच सक्रियतेने कार्यरत असून, १ जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट (अप्लाइड आर्ट)च्या आवारात एक विशेष वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

हा कार्यक्रम फाउंडेशन आर्टच्या विद्यार्थ्यांनी आणि अप्लाइड आर्ट विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे मोठ्या उत्साहात पार पाडला.
बळीराजाचा सन्मान, ज्याच्या परिश्रमामुळे आपण अन्न ग्रहण करू शकतो, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. महाविद्यालयाच्या हरित परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला.

या कार्यक्रमाला डी. जी. बांदेकर ट्रस्टचे चेअरमन केदार उर्फ गोविंद बांदेकर, खजिनदार गीता बांदेकर, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. उदय वेले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
याशिवाय, प्रा. सिद्धेश नेरुरकर, तुकाराम मोरजकर, प्राजक्ता वेंगुर्लेकर, तुळशीदास नाईक, धनंजय परब, राधा गावडे, चेतन जगताप, आत्माराम शिरोडकर, सुभाष राव, अनिल बांदेकर, पल्लवी गावडे, हनुमंत केरकर, चारुदत्त शंकरदास यांच्यासह महाविद्यालयातील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आपापल्या हाताने रोपे लावून त्यांची देखभाल करण्याची जबाबदारीही स्वीकारली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, पर्यावरणाची जाणीव आणि बळीराजाबद्दल आदर यांची भावना अधिक बळकट झाली.
अंतिम वर्षाच्या समृद्धी पोटफोडे या विद्यार्थिनीने या दिनाबद्दल सुंदर संदेश वजा माहिती दिली तर विष्णुप्रसाद सावंत याने उपस्थित व सहकाऱ्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *