
रोणापाल मडूरा तिठा येथील श्रीहनुमान मंदिराची शिखर कलश स्थापना करताना प. पू. दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज.
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
दिनांक: २६ एप्रिल २०२५
रोणापाल – मडूरा तिठा येथील दक्षिणाभिमुखी श्री हनुमान मंदिर शिखर कलशारोहण आणि मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळा भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दाभोली मठाचे प. पू. दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या हस्ते शिखर कलश स्थापना व मारुती मूर्ती स्थापना करण्यात आली. यावेळी ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
रोणापाल – मडूरा तिठा येथील दक्षिणाभिमुखी श्री हनुमान मंदिराचा शिखर कलशारोहण व मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त गुरुवार २४ रोजी सकाळी होमहवन व विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी रामकृष्ण हरी संगीत गुरुकुल, तेंडोली यांचा ‘गीत रामायण’ हा कार्यक्रम झाला.
शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या मुहूर्तावर दाभोली मठाचे प. पू. दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या हस्ते शिखर कलश स्थापना पार पडली. त्यानंतर ९ वाजता मारुती मूर्ती स्थापना, प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळी स्वामींची पाद्यपूजा, महापूजा, तत्वहोम, पूजांगहोम, क्षेत्रपाल बलिदान, महापुर्णाहुती, दुपारी महानैवेद्य, आरती, मंत्रपुष्पांजली, प्रार्थना, ब्राम्हण पूजन, आशीर्वाद व महाप्रसाद हे कार्यक्रम संपन्न झाले. सायंकाळी जय संतोषी माता दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग झाला.
हा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. सोहळ्याचे श्री हनुमान देवस्थान समिती मार्फत नीटनेटके आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मुंबई, पुणे, गोवा येथील चाकरमान्यांसह मडूरा दशक्रोशीतील हजारो भाविक सोहळ्यात सहभागी झाले होते.