सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर
दिनांक: २४ मे २०२४
राज्यातील पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर अशा प्रसिद्ध मंदिरामध्ये भजन सादर करण्याची अनेक भजनी कलाकारांची इच्छा असते. अनेकांचे हे स्वप्न अधुरे राहते. परंतु माजगावच्या ओंकार महापुरुष भजन मंडळाने निश्चय व इच्छा शक्तीच्या जोरावर योग्य नियोजन करून राज्यातील प्रसिद्ध चार मंदिरामध्ये भजन सेवा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली. या भजन मंडळाने आपल्या सुश्राव्य भजनाने मंदिरातील भाविकांना मंत्रमुग्ध केलेच. उल्लेखनीय म्हणजे या मंडळाने या चारही देवतांच्या महतीवर अभंग सादर केल्यामुळे मंदिर ट्रस्टींच्या शाबासकीची थापही मिळवली. त्यानंतर या सर्व मंदिर ट्रस्टनी या भजन मंडळाच्या आदरतिथ्यासह त्यांचा यथोचित सन्मानही केला.
या भजन सेवा परिक्रमाच्या अक्कलकोटच्या नियोजनात कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश कांदे आणि माजगावचे रुपेश नाटेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यानंतर मंडळाचे विक्रम जाधव यांनी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, सोलापूर येथील शंकर महाराज यांचा शुभराय मठ, पंढरपूरचे क्षेत्र विठ्ठल मंदिर आणि नरसोबाचीवाडी येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर या चारही मंदिर ट्रस्टीसी संपर्क साधून आणि त्यांची परवानगी घेऊन भजन सेवेची तारीख व वेळ निश्चित केली. त्यानंतर या चारही मंदिरात भजन सेवा करण्यासाठी या देवस्थानची महती असलेले अभंग व गाणी ट्रस्टींकडून घेतली.
उल्लेखनीय म्हणजे एच बी सावंत यांनी सोलापूरच्या शुभराय मठाच्या महतीचे व्हिडिओ मागवून घेऊन स्वतःच अभंग तयार केले. त्यानंतर या भजन सेवा परिक्रमेच्या पूर्वतयारीसाठी या देवतांच्या सर्व अभंग व गाण्याची माजगावात उजळणी करण्यात आली.
माजगाव नाईकवाडा येथील ओंकार महापुरुष भजन मंडळाने आपल्या या भजन सेवा परिक्रमेत प्रथम अक्कलकोटला पोहोचल्यानंतर सुरवातीला संध्याकाळी अक्कलकोटच्या श्रीक्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मंदिर आपली सेवा अर्पण केली. यावेळी मंडळाने सादर केलेल्या स्वामी समर्थांच्या जीवनावरील सुश्राव्य अभंगासह भक्ती गीताने उपस्थित भाविकांची मने जिंकली. यावेळी श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी ओंकार महापुरुष भजन मंडळाचा यथोचित सन्मान केला. तसेच जेवण व राहण्यासाठी ट्रस्टचे कर्मचारी अविनाश क्षिरसागर, वैभव जाधव, शैलेश गवंडी यांचे सहकार्य लाभले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सोलापूर येथील शंकर महाराज यांच्या शुभराय मठात मंडळाचे एच बि सावंत रचीत अभंग व गीते सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी एच बी सावंत यांनी सादर केलेल्या स्वरचित ‘मी आहे रे आहे…’ या अभंगाने तर शंकर महाराज यांच्या आठवणी जागृत केल्या. यावेळी मठाच्या ट्रस्टी शुभांगी ताई बुवा याही भाऊक झाल्या. विशेष म्हणजे शंकर महाराज हे स्वामी समर्थांचे लाडके शिष्य होते. योगायोग म्हणजे याच दिवशी शंकर महाराज यांची पुण्यतिथी होती. याच दिवशी त्यांच्या मठात भजन सादर करण्याचे भाग्य या मंडळाला लाभले.
याच दिवशी संध्याकाळी पंढरपूरचे श्रीक्षेत्र विठ्ठल मंदिरात भजन केले. मंडळाने सादर केलेल्या विठ्ठलमय भजनाने उपस्थित भाविकांचे कान तृप्त झाले. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी कोल्हापूर नरसोबाचीवाडी येथील श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात भजन केले. यावेळी मंडळाने श्रीदत्त आणि टेंबे स्वामी महाराजांचे अभंग सादर केले. आणि या मंडळाने आपली भजन सेवा परिक्रमा पूर्ण केली. या भजन सेवा परिक्रमेत सोलापूर, पंढरपूर, नरसोबाचीवाडी या ठिकाणीही या मंडळाचे आदरतिथ्य, सन्मान, जेवण आणि निवासाची सोय करण्यात आली.
भजन सेवा परिक्रमेत
तीन पिढ्यांचा सहभाग
या भजन सेवेत विक्रम जाधव, अँड. चंद्रशेखर ऊर्फ सचिन गावडे, विलास नाईक, ज्ञानेश्वर सावंत, राकेश कांदे या गायकांना संगीतसाथ हनुमंत बाबाजी सावंत (हार्मोनियम), विवेकानंद बाबाजी सावंत, सोमेश्वर सावंत, अमित चौगुले (तबला), अनिकेत गावडे, नारायण चौगुले, विठ्ठल सावंत, नारायण नाईक, संदिप गावडे, विघ्नेश सावंत (कोरस) यांनी दिली. या भजन सेवा परिक्रमेत एकाच वाड्यातील तीन पिढ्यांचा सहभाग होता. त्यात १० वर्षाच्या मुलांपासून युवक तरूण जेष्ठ ते ९३ वर्षाच्या वृद्ध भजनी कलाकारांचाही समावेश होता.