बांदा प्रतिनिधि/ अक्षय मयेकर
दिनांक: १२ डिसेंबर २०२४
दिव्य ज्योती स्कूल ,डेगवे प्रशालेत मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी विद्यार्थी व पालकांसाठी खास मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे येथील प्रसिद्ध मनशक्ती मार्गदर्शक, बालमानसशास्त्र अभ्यासक व करियर मार्गदर्शक श्री. आदित्य तेंडले यांनी या कार्यशाळेत विशेष मार्गदर्शन केले .त्यांनी खास पालकांसाठी ‘आधुनिक पालकत्व नातेसंबंध- समस्या आणि मार्ग ‘या विषयावर मार्गदर्शन केले .
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना, आपल्या पाल्याचे संगोपन करताना पालकांना येणारी आव्हाने आणि संधी ,पालकांची जबाबदारी, पालक व पाल्य यांच्यातील भावनिक नातेसंबंधांचे महत्त्व ,आवश्यकता आदी मुद्द्यांवर विवेचनातून तसेच कृती सत्रातून मार्गदर्शन केले .तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तणाव मुक्त परीक्षा कशा द्याव्यात, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, आपले ध्येय कधी ठरवावे ,त्यासाठी कसे प्रयत्न करावेत ,करिअरच्या संधी कशा शोधाव्यात यांच्यात आपल्यातील ताकद व कमतरता कशी ओळखावी यासंदर्भात मार्गदर्शन केले.
पालकांनी डॉ. आदित्य तेंडले यांच्याशी थेट संवाद साधत आपल्या शंकांचे निरसन केले. या कार्यशाळेला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.