बांदा प्रतिनिधि /अक्षय मयेकर
दिनांक:१२ डिसेंबर २०२४
भालावल फौजदारवाडी येथील संतोष नारायण गुळेकर यांचा पार्टीत झालेल्या वादातून खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने आज पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी मुख्य संशयित तेथीलच चेतन रवींद्र परब (वय ३५) याला सायंकाळी उशिरा पोलिसांनी अटक केली. तर पार्टीत सहभागी असलेल्या अन्य सहा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर आरोपीच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले व उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत जलदगतीने तपास करण्याच्या सूचना बांदा पोलिसांना दिल्यात.
याबाबत मयत संतोष यांचा पुतण्या नितीन महेश गुळेकर यांनी बांदा पोलिसात फिर्याद दिली आहे. आज दिवसभर घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेक्षणचे तसेच न्यायवैदक प्रयोगशाळेचे पथक यांनी ठाण मांडून माहिती गोळा केली. मयताचे घर व ज्याठिकाणी पार्टी झाली ते ठिकाण पोलिसांनी सील करत त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल मंगळवारी सायंकाळी संतोष याचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी संशयास्पदरीत्या आढळला होता. पोलिसांनी मयताचा भाऊ पंढरीनाथ यांच्या फिर्यादीनुसार पोलिसात आकास्मिक मृत्यूची नोंद केली होती. आज सकाळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी मृतदेहाचे विच्छेदन केले. यामध्ये मयताच्या डोक्यावर डाव्या बाजूला खोलवर गंभीर वार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संतोष याचा खुनच झाल्याची पुष्टी मिळाली. त्यानंतर बांदा पोलिसांनी तपासाची चक्रे जोरदार फिरविली.
विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर बांदा पोलिसांचे पथक तात्काळ भालावल येथे दाखल झाले. त्यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेक्षणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक समीर भोसले, न्यायवैदकचे निरीक्षक प्रशांत मांगडे, उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, उपनिरीक्षक सुनील पडवळ, राजेश गवस, बाळकृष्ण गवस, प्रसाद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी मुख्य संशयित चेतन परब याला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले. त्याने आपणच मयताला दारूच्या नशेत प्लास्टिक खुर्चीच्या साहाय्याने मारहाण केल्याची प्राथमिक कबुली पोलिसांना दिली. यावेळी आपल्यासोबत रविवारी (ता. ८) अन्य सहाजण पार्टीत सहभागी असल्याची माहिती दिली. तसेच त्यांची नावे चौकशीत उघड केली.
मुख्य संशयिताने दिलेल्या माहितीनुसार बांदा पोलिसांनी सहाहीजणांना विविध ठिकाणावरून ताब्यात घेतले. सुरुवातीला ते संदीग्ध माहिती देत होते. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी पार्टीत घडलेली सविस्तर माहिती दिली. त्यांच्याकडून माहिती घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. त्यामुळे या प्रकरणात आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मयत संतोष हा संशयितच्या घरी कोसळला तर त्याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी कसा सापडला हे गूढ उकलण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे राहिले आहे. त्याच्या मृत्यूस अन्य कोणी कारणीभूत आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. उद्या संशयिताला सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक विकास बडवे करत आहेत.