बांधा प्रतिनिधी / अक्षय मयेकर
दिनांक: ३ डिसेंबर २०२४
कोकण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल पुरस्कृत येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या शालेय प्रकट वाचन स्पर्धेत लहान गटात नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीच्या मैथिली सावंत हिने तर मोठ्या गटात राजा शिवाजी विद्यालय, विलवडेच्या खुशी परब हिने प्रथम क्रमांक मिळविला. दोन्ही गटात स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धा वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात संपन्न झाली.
पाचवी ते सातवी या लहान गटात दिव्यल गावडे (जि. प. इन्सुली शाळा नं. ४), किंजल सावंत (जि. प. शाळा, असनीये) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या गटात दिव्या पोकळे (जि. प. शाळा, असनीये) व मानस दळवी (जि. प. शाळा, विलवडे) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
आठवी ते दहावी या मोठ्या गटात साक्षी गवस (राजा शिवाजी विद्यालय, विलवडे), रितीशा देसाई (माध्यमिक विद्यालय, डेगवे) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. या गटात आरती कोठावळे (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) व वेदिका देसाई (माध्यमिक विद्यालय, डेगवे) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण महाबळेश्वर सामंत व सुनील नातू यांनी केले.
तत्पूर्वी स्पर्धेचे उदघाटन वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष निलेश मोरजकर, कोकण विकास संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक सौ. श्रुती तारी, वाचनालयचे सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, शंकर नार्वेकर, अनंत भाटे, ग्रंथपाल सौ. सुस्मिता नाईक आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच नियमित वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले. आभार हेमंत मोर्ये यांनी मानले.