बांधा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर
ता:१ मे २०२४
तिलारी कालव्यातून रोणापालपर्यंत तातडीने पाणी सोडावे या मागणीसाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी चराठे येथील तिलारी कालवा विभागात धडक दिली. गेले २८ दिवस ज्या कारणासाठी पाणी बंद केले होते, त्या कामाचे काय झाले ? असा प्रश्न उपस्थित करताच कार्यकारी अभियंता विनायक जाधव निरुत्तर झालेत. कालवा विभागाचे अभियंता केवळ ठेकेदारांचे चोचले पुरवतात असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. कास मायनर कालव्याचे काम सर्वप्रथम निगुडे झिरो पॉईंट पासून बांदा शिरोडा डोंकल रस्त्यापर्यंत पूर्ण करावे. अन्यथा पोट कालव्याची कामे करू देणार नाही. त्यासाठी प्रसंगी कायदा हातात घेऊ, असा इशारा यावेळी संतप्त ग्रामस्थांनी दिला.
तिलारी बांदा शाखा कालव्यातून पाणी गेले २८ दिवस बंद आहे. त्यामुळे कालव्याच्या भरवशावर केलेली नगदी पिकांची शेती तसेच नारळ, पोफळी रोपे पाण्याअभावी करपून गेली आहेत. शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची केलेली गुंतवणूक डोळ्यादेखत नष्ट होताना दिसत आहे. त्यामुळे परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी पाण्यासाठी तिलारी कालवा विभागात धडक दिली. यावेळी कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. कालवा विभाग कशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत हे उदाहरणासहित दाखवून दिले. ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अभियंता जाधव हे हतबल झालेले दिसत होते.
तिलारी कालव्याचे ठेकेदार मनमानीपणे काम करत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. कास मायनर कालव्याचे काम करताना निगुडे झिरो पॉईंट पासून सुरू करणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराने शेवटच्या टप्प्यापासून काम सुरू केले. सुरुवातीचे काम अर्ध्यावरच सोडले. हे काम करण्यासाठी गेले महिनाभर कालव्यातून पाणी सोडणे बंद केले होते. त्याचा फटका शेती बागायतीसह अनेक गावातील नळपाणीपुरवठा योजनेला बसला. मात्र, याचे सोयरसुतक ठेकेदार कंपनी किंवा विभागाचे अभियंता यांना नसल्याची टीका ग्रामस्थांनी केली.
तिलारी कालव्यातून पाणी सोडण्यास प्रारंभ केला असून येत्या तीन दिवसात रोणापालपर्यंत कालव्याचे पाणी पोहोचेल असे अभियंता जाधव यांनी स्पष्ट केले. ज्या कारणासाठी गेले महिनाभर पाणी बंद होते, त्या कामाचे काय झाले ? असा प्रश्न करताच अभियंता जाधव निरुत्तर झाले. ठेकेदार कंपनी किंवा शाखा अभियंता यांनाही कोणतेही आदेश न केल्याने ग्रामस्थ संताप्त झालेत. निगुडे झिरो पॉईंट पासून मडुरा रस्त्यापर्यंतचे काम प्राधान्याने न केल्यास त्यापुढील काम करू देणार नाही. प्रसंगी कायदा हातात घेऊ, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच कृष्णा परब, ग्रा. पं. सदस्य योगेश केणी, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, मडूरा माजी ग्रा. पं. सदस्य प्रकाश वालावलकर, अरुण पंडित, सागर गोठसकर, कुमार शेगडे आदी उपस्थित होते.